पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्यावरच लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:41+5:302021-05-24T04:25:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनचे प्रत्येकी १४ दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना स्थिती किती नियंत्रणात आली याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी केले.
पालकमंत्री पाटील यांनी कोरोना स्थितीचा ऑनलाईन आढावा घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे व परिस्थिती लक्षात घेऊन सर्वमान्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या सध्या स्थिर असली व पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २२ टक्क्यांवर असला तरी तो अजूनही कमी होणे आवश्यक आहे. गावपातळीवर दक्षता समित्यांनी केलेल्या नियोजनामुळे अनेक गावातील बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी ज्या गावात अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ कायम आहे, त्या गावात प्रशासनाने विशेष लक्ष देऊन नियोजन करावे. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित होण्यासाठी गावांमध्ये सामूहिक अलगीकरण अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही अलगीकरणामध्ये ठेवावे, जेणेकरून संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, लॉकडाऊन असतानाही रुग्ण संख्या वाढत आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक घ्यावी व आतापासूनच त्याची तयारी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
आमदार सदाभाऊ खोत, अरुण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठकीत सहभाग घेतला.
चौकट
तिसरी लाट रोखण्याचे नियोजन हवे
पालकमंत्री पाटील म्हणाले की, सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी वाढ कायम आहे. रूग्णसंख्या अजूनही कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाने आतापासूनच त्याची तयारी करावी.