‘तरुणाई’च्या हातात उमेदवारांचे भवितव्य!
By admin | Published: October 9, 2014 10:04 PM2014-10-09T22:04:27+5:302014-10-09T23:04:47+5:30
प्रमाण एकवीस टक्क्यावर : जिल्ह्यात साडेचार लाख तरुण मतदार
नरेंद्र रानडे - सांगली -लोकसभा निवडणुकीत प्रत्यय आल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरुणाईचे वारे ज्या उमेदवाराच्या दिशेने वाहील, त्याच्या विजयाची नौका किनाऱ्याला लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात तब्बल ४ लाख ६३ हजार ७२० मते ‘तरुणाई’ची आहेत. एकूण मतदानाच्या तुलनेत २१ टक्के निर्णायक मते तरुणांच्या हातात आहेत. मतांचे गणित लक्षात घेऊन उमेदवारांचे लक्ष तरुणाईवरच आहे.
विधानसभा निवडणुका पंचरंगी होत आहेत. यामुळे प्रत्येक पक्षाला स्वबळ तपासता येणार आहे. निवडणुका जिंकायच्या असतील तर, नव्या दमाचा तरुण मतदार कसा आकर्षित होईल, यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत. प्रचारातदेखील तरुणाईचा वावर वाढत चालला आहे. तरुणांनी निष्क्रिय न राहता अधिकाधिक प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयांतूनही मतदानाचा जागर नित्यनेमाने सुरु आहे. परिणामी निवडणुकीत पुन्हा मतदान केंद्राबाहेर युवकांच्या रांगा लागलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको. उमेदवारांना तरुणाईच्या ताकदीचा अंदाज आल्याने दिवसातून प्रचार कार्यक्रमातील ठराविक बैठका या पिढीसोबत होत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्याची आश्वासने देण्यात येत आहेत. तरुण पिढी आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षाचे नेतेदेखील प्रयत्नशील आहेत.
मतदारसंघाचे नाव तरुण मतदार
मिरज५९,४२५
सांगली६६,७४९
इस्लामपूर५२,२३४
शिराळा५५,९६४
पलूस-कडेगाव५७,५८९
खानापूर६२,९३३
तासगाव-क.महांकाळ५४,२५७
जत५४,५७८
तेरा हजार तरुणाईचे पहिल्यांदाच मतदान
१ जानेवारी २०१४ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा महाविद्यालयातर्फे जागृती केल्याने युवकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच दि. १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील १३,१८६ युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.