नेत्यांच्या समझोत्यावरच काँग्रेसचे भवितव्य

By admin | Published: January 29, 2017 11:03 PM2017-01-29T23:03:44+5:302017-01-29T23:03:44+5:30

जिल्हा परिषदेचा गड जिंकण्याचे आव्हान : सोयीनुसार स्थानिक आघाड्यांमुळे काँग्रेसचे नुकसान

The future of the Congress on the Leaders' Compromise | नेत्यांच्या समझोत्यावरच काँग्रेसचे भवितव्य

नेत्यांच्या समझोत्यावरच काँग्रेसचे भवितव्य

Next



अशोक डोंबाळे ल्ल सांगली
स्थापनेपासूनच जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र १९९९ मध्ये काँग्रेसमधून दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे २००२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडून राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. ते खिंडार मुजवण्यात काँग्रेसच्या नेत्यांना आजअखेर यश आलेले नाही. २०१७ च्या निवडणुकीत तरी कदम आणि वसंतदादा गट मनापासून एकत्र येऊन जिल्हा परिषदेचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार का?, अशी चर्चा होत आहे.
जिल्हा परिषदेची स्थापना १२ आॅगस्ट १९६२ ला म्हणजे जिल्ह्याच्या निर्मितीनंतर दोन वर्षांनी झाली. पहिले अध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसचेच कवठेमहांकाळचे बळवंत कोरे यांनी पटकावला होता. १९६२ ते २००२ पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या १९ अध्यक्षांपैकी सर्वाधिक १२ अध्यक्ष काँग्रेसचे होते. उर्वरित सात वेळा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिले आहे. अपक्ष, शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांचे किरकोळ संख्याबळ सोडल्यास, सभागृहात सर्व सदस्य काँग्रेसचेच होते. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. जिल्ह्यातील काँग्रेसमधील दिग्गज नेते राष्ट्रवादीत गेले. यामुळे काँग्रेस कमकुवत झाली. २००२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसचा पराभव केला. जिल्हा परिषदेतील ६१ पैकी राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ३७, काँग्रेसकडे केवळ २३ जागा आणि शिवसेनेकडे एक जागा आली. २००२ पासून आजअखेर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आलेले नाही. याला काँग्रेसमधील नेत्यांची गटबाजी हे एकमेव कारण आहे.
२०१७ च्या निवडणुकीत तरी गटबाजी बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील आमदारांची संख्या कमी झाली आहे. खासदारकीही गेली आहे. राष्ट्रवादीचीही तीच परिस्थिती आहे. पण, भाजपचे चार आमदार आणि एक खासदार अशी कामगिरी आहे. शिवसेनेकडे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे बळ आहे.
राष्ट्रवादीतून मोठा गट भाजपमध्ये गेल्याने भाजप सक्षम आणि राष्ट्रवादी खिळखिळा झाला आहे, पण त्यामुळे काँग्रेस मजबूत झाल्याचे चित्र दिसत नाही. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आमदार शिवाजीराव देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख, जयश्रीताई पाटील हे नेते किती मनापासून एकत्र येतात, यावरच पक्षाचे यश अवलंबून आहे.
काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढणार, असे जिल्हाध्यक्ष कदम सांगत आहेत. त्याचवेळी सत्यजित देशमुख यांनी शिराळ्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आहे. वाळवा तालुक्यात काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भाजपसोबत आघाडी केली आहे. तीच परिस्थिती मिरज पश्चिम भागात आहे. प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाने स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना यांच्याशी बोलणी चालू केली आहेत. खानापूर तालुक्यात सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून रणनीतीही आखली आहे. हीच परिस्थिती आटपाडी तालुक्यात असून तेथील काँग्रेसचा गट राष्ट्रवादीबरोबर जाण्याच्या तयारीत आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात तीच परिस्थिती आहे. असे असेल, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेला अर्थ काय आहे, हे त्यांनाच माहीत!


काँग्रेस नेत्यांची प्रत्येक तालुक्यात वेगळी भूमिका
काँग्रेसमधील नेत्यांनी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्षाला जिल्हा परिषदेचा गड काबीज करता येईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते एकत्र राहिले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली, तर पक्ष मजबूत होणार आहे. नाही तर काँग्रेसला २०१२ च्या निवडणुकीतील संख्याबळ टिकविणेही कठीण जाईल, अशी परिस्थिती आहे. कदम-दादा गटासह काँग्रेस नेत्यांनी एकसंध प्रयत्न केले, तरच जिल्हा परिषद निवडणुकीतील चित्र वेगळे दिसेल.

Web Title: The future of the Congress on the Leaders' Compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.