महापालिकेवर गाढव मोर्चा : सांगलीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:37 PM2018-05-29T23:37:55+5:302018-05-29T23:37:55+5:30
वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला.
सांगली : वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महापौर व आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. तसेच महापौर व आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रातील दलित कुटुंबीय झोपडपट्टीत राहत होते. मात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली दलित कुटुंबियांना वाल्मिकी आवास योजनेसारखी घरकुले बांधून दिली. मात्र त्या ठिकाणी गटारी, रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी कोणत्याही सुविधा महापालिकेने दिल्या नाहीत. याविरोधात दलित महासंघाने यापूर्वी मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्यानंतर महापालिकेने आठ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. पण आश्वासन देऊन तीन महिने उलटले तरी, कामांना सुरूवात झाली नाही. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे पुन्हा घरकुल धारकांना सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.
महापौर व आयुक्तांनी वाल्मिकी आवास, शिवशंभो कॉलनी, आरवाडे प्लॉट, शिंदे मळा, जुना बुधगाव रोड, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील गटारी, रस्ते, ड्रेनेजची कामे तत्काळ करावीत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपायुक्त व प्रशासकीय अधिकारी गेले होते. मात्र त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. महापौर व आयुक्त आल्याशिवाय निवेदन देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांनी अडविले.
या आंदोलनात संपर्कप्रमुख महेश देवकुळे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शेलार, राजाभाऊ खैरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनीताताई कांबळे, अजित आवळे, किशोर आवळे, अभिमन्यू वाघमारे, सागर कांबळे, सुनील वारे, राकेश चंदनशिवे, विटाताई देवकुळे, कल्पना चव्हाण, रेखा आवळे, अर्चना घाटगे, सोनाली कांबळे आदी सहभागी झाले होते.
आता चप्पल मोर्चा
कार्यकर्त्यांनी महापौर व आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. आठ दिवसात नागरी सुविधा न मिळाल्यास आयुक्तांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.