गडकरी, पवार आले अन् गेले, महिन्याभरानंतर हेलिपॅडसाठी निविदा

By शीतल पाटील | Published: March 1, 2023 08:57 PM2023-03-01T20:57:06+5:302023-03-01T20:57:34+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज संशयाच्या भोवऱ्यात

Gadkari, Pawar came and went, tender for helipad after a month | गडकरी, पवार आले अन् गेले, महिन्याभरानंतर हेलिपॅडसाठी निविदा

गडकरी, पवार आले अन् गेले, महिन्याभरानंतर हेलिपॅडसाठी निविदा

googlenewsNext

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगली दौऱ्यावर होते. त्यांचे हॅलिकाॅफ्टर उतरविण्यासाठी ब्रम्हानंदनगर (ता. पलूस) येथे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही नेत्यांचा जिल्हा दौरा होऊन महिना झाला. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने हेलिपॅडसाठी प्रत्येकी साडेआठ लाख रुपयांची निविदा काढली आहे. विलंबाने प्रसिद्ध केलेल्या निविदेवर नागरिक जागृती मंचाने आक्षेप घेतला आहे.

सांगली-पेठ रस्त्याच्या भूमिपूजनासाठी २७ जानेवारी रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर आले होते. याच दिवशी क्रांती साखर कारखान्यावरील कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दौऱ्यावर होते. शिवाय गडकरी व पवार यांनी भिलवडी येथील चितळे डेअरीतील कार्यक्रमाला एकत्रित उपस्थित लावली होती. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यासाठी ब्रम्हानंदनगर येथे हेलिपॅड तयार करण्यात आले होते.
दोन्ही नेते जिल्हा दौऱ्यावर येऊन महिना लोटला आहे. आता हेलिपॅडसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली आहे. प्रत्येकी ८ लाख ६७ हजार रुपयांची ही निविदा आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत ८ मार्चपर्यंत आहे. राजकीय नेते येऊन गेल्यानंतर निविदा काढल्याने कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिक जागृती मंचाचा आक्षेप
नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेत मोठा घोळ आहे. महिन्याभरानंतर हेलिपॅड तयार करण्यासाठी निविदा काढली आहे. त्यात दोन्ही नेत्यांचे कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांनीच स्वखर्चातून हेलिपॅड बनविल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी स्वखर्चाने हेलिपॅड तयार केले असेल तर मग सार्वजनिक बांधकामने निविदा कशासाठी काढली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Gadkari, Pawar came and went, tender for helipad after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली