गडकरींच्या घोषणेचा फुगा फुटणार काय?
By admin | Published: December 10, 2014 10:54 PM2014-12-10T22:54:28+5:302014-12-10T23:45:24+5:30
शिवाजीराव नाईक समर्थक अस्वस्थ : सदाभाऊ खोत यांच्याही मंत्रिपदाची शक्यता धुसर
अशोक पाटील - इस्लामपूर -‘तुम्ही निवडून द्या, कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी’, अशा वल्गना करुन मतांचा जोगवा मागणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेचा फुगा फुटणार काय? अशीच चर्चा वाळवा—शिराळा तालुक्यात आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने, गडकरींच्या त्या घोषणेवर आजही प्रश्नचिन्ह आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवाजीराव नाईक यांचा समावेश न केल्याने त्यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपुरते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांचे सहकार्य घेतले. तेव्हापासून शेट्टी यांनी ‘रात गयी बात गयी’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाईक व खोत यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे.
शिराळा मतदारसंघात कामेरी हे महत्त्वाचे गाव मानले जाते. या गावाच्या भूमिकेवरच शिराळ्याचा आमदार ठरतो. याच गावात शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी, ‘नाईक यांना विजयी करा, त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी’, अशी घोषणा केली होती. या त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून येथील जनतेने शिवाजीराव नाईक यांना मतदान करुन विजयी केले. मतदारांनी त्यांचे काम केले, परंतु गडकरी यांनी मात्र त्यांचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्याने शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला.
याच पार्श्वभूमीवर नाईक आणि खोत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, अशीच खात्री गडकरी देत होते. परंतु या दोघांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. याच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे बडे नेते व साखरसम्राट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीमुळेच मंत्रीपद नाही ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीतून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी भाजपने युती तोडल्याने नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला. आता केंद्रासह राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले आहे, मात्र सदाभाऊ व शिवाजीराव नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळात सात ते आठ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. त्यामध्ये शिवसेनेला २ व भाजपला ६ अशी विभागणी होणार आहे. शिराळा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. भाजपमधील कोअर कमेटीतील सदस्यांचा आदर ठेवूनच निर्णय घेतला जातो. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपणास निश्चित संधी मिळणार आहे.
- शिवाजीराव नाईक,
आमदार, भाजप.