शिराळ्यातील गाेरक्षनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:16+5:302021-05-04T04:11:16+5:30
शिराळा : शिराळा येथील श्री गोरक्षनाथांची दि. ७ ते १४ मे दरम्यान हाेणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी ...
शिराळा : शिराळा येथील श्री गोरक्षनाथांची दि. ७ ते १४ मे दरम्यान हाेणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. मंदिरही दर्शनासाठी बंद असणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे, मठाधिपती पीर योगी पारसनाथ यांनी दिली.
श्री गोरक्षनाथ मंदिरात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रसार आणि शासनाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे श्री गोरक्षनाथ यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच या दरम्यान मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे याठिकाणी भाविक आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मठाधिपती पीर योगी पारसनाथ म्हणाले, यात्रेच्या दरम्यान मंदिरातील सेवक व पुजारी यांच्या उपस्थितीत पहाटे ३.३० ला गुप्त अभिषेक, गेली ८ वर्षे सुरू असणारा २४ तास ओम नम: शिवाय अखंड जप, आरती, पूजा आदी विधी केले जातील. यावेळी आनंदनाथजी महाराज, उपनगराध्यक्ष विजय दळवी, अर्चना गायकवाड, सुविधा पाटील, नैना कुंभार, स्वप्निल निकम, लक्ष्मण मलमे आदी उपस्थित होते.