गायरानवाडी-बेडग रस्ता ठरताेय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:36+5:302021-06-17T04:18:36+5:30
२०१७ साली नरवाड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील पहिला रस्ता पूर्ण करण्यात आला. साडेसहा किलोमीटर अंतराचा गायरानवाडी ते ...
२०१७ साली नरवाड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील पहिला रस्ता पूर्ण करण्यात आला. साडेसहा किलोमीटर अंतराचा गायरानवाडी ते बेडग व्हाया नरवाड हा रस्ता ३ कोटी ५६ लाख रुपये निधी खर्च करून पूर्ण करण्यात आला. यामध्ये रस्ता रुंदीकरण, मुरमीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्याचे उद्घाटन
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०१६ साली ग्रामविकास खात्याकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हे काम मंजूर झाले होते. २०१७ साली काम पूर्ण झाल्यानंतर २०२२ पर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे आहे. सुरुवातीस एक-दोन वेळा
रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र, यानंतर ठेकेदाराने याकडे ढुंकूनही पाहिले नाही. सध्या रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहेत. यामुळे समोरील वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नरवाड-बेडग दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूंच्या गटारीही तुंबून राहिल्या आहेत. याप्रश्नी किसान विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय लिंबीकाई व ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्याने शासनाकडून बिले मिळत
नसल्याने रस्ता दुरुस्त करू शकत
नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाची माहिती देणाऱ्या फलकातून ठेकेदाराची देखभाल दुरुस्तीची तारीख व तरतूद खाेडून टाकली आहे. ग्रामपंचायत सदस्या विजयमाला भेंडवडे यांनीही रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काेट
ठेकेदारांची रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची बिले २०१६ पासून रखडली आहेत. यामुळे ठेकेदार रस्ता दुरुस्तीकडे
दुर्लक्ष करीत आहे.
- पृथ्वीराज चव्हाण
कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना