इस्लामपूरच्या विकासाचा खेळ अर्ध्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:07+5:302020-12-24T04:24:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात विकासकामांवर वादळी चर्चा होते. अंदाजपत्रक ठरविले जाते. मात्र, नंतर शहरातील ...

The game of development of Islampur is only half over | इस्लामपूरच्या विकासाचा खेळ अर्ध्यावरच

इस्लामपूरच्या विकासाचा खेळ अर्ध्यावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात विकासकामांवर वादळी चर्चा होते. अंदाजपत्रक ठरविले जाते. मात्र, नंतर शहरातील झालेली आणि सुरू असलेली विकासकामे मात्र निकृष्ट आणि अर्धवट दिसतात. हे चित्र नेहमीचेच आहे. याचे सत्ताधारी आणि विरोधकांना गांभीर्य नाही.

इस्लामपूर शहराचा विकास होण्यापेक्षा खुंटला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरात घरकुल योजना सुरू आहे. पूर्ण झालेल्या घरकुलांची अवस्था दयनीय आहे. या योजनेला सहा कोटी रुपयांची गरज आहे. निधीअभावी योजना अर्ध्यावरच रखडली आहे. अशीच अवस्था भुयारी गटारांची आहे. रस्त्याच्या विकासातील निधी भुयारी गटारीत खर्ची पडत आहे. हे कामही थांबले आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था खडतर बनली आहे. लगूनखड्यात कोट्यवधी रुपये घातले आहेत. त्यात अधिकाऱ्यांनी किती गोलमाल केला आहे, याकडे लोकप्रतिनिधींनी कधीच पाहिले नाही. बोटिंग क्लबचे काम दुसऱ्या टप्प्यावर येऊन थांबले आहे. तिसऱ्या टप्प्याला लागणारा ३० ते ३५ लाखांचा निधीच नाही. शहरात फूटपाथ करण्याचा ठराव झाला, परंतु त्याला गती नाही. इस्लामपूर हायस्कूलच्या भिंतीलगतच्या हरितपट्टा लॉनचे तीस लाख नियोजनाअभावी वाया गेले आहेत. गेल्या चार वर्षांत रस्ते, गटारीसाठी पालिकेला निधी मिळविता आला नाही.

गटनेते विक्रम पाटील यांनी निधी आणला. मात्र, त्यातील काही रक्कम पालिकेला मिळाली नसल्याचे कळते. आरोग्य अभियानांतर्गत पालिकेला बक्षीसरुपात साडेसात कोटी रुपये मिळाले. त्याचेही नियोजन झाले नाही. उलट आरोग्य यंत्रणाच कोमात असल्याने डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या साथीने नागरिक अस्वस्थ आहेत. सभागृहात मात्र विकास निधीच्या आकडेमोडीवर काथ्याकूट सुरू आहे.

कोट

गेल्या चार वर्षांत सत्ताधारी विकास आघाडीला विकासाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे विकास उलट्या दिशेने सुरू आहे. विकासाच्या घोषणा झाल्या असल्या तरी, नियोजनाअभावी कामे अर्धवट झाली आहेत.

- शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोगो : इस्लामपूर नगरपालिका

Web Title: The game of development of Islampur is only half over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.