गणपतीबाप्पा, यंदा तुझी आराधना साधेपणानेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:24+5:302021-09-08T04:32:24+5:30
सांगली : सांगलीत सलग तिसऱ्यावर्षी शहरातील मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. २०१९ मध्ये महापूर, २०२० व २०२१ ...
सांगली : सांगलीत सलग तिसऱ्यावर्षी शहरातील मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. २०१९ मध्ये महापूर, २०२० व २०२१ मध्ये कोरोना व लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी साडेचारशेहून अधिक मंडळांना नोटिसा बजावल्या असून, मिरवणुका व रस्त्यावर उत्सवाला प्रतिबंध केला आहे.
अमृतमहोत्सव आणि शतकमहोत्सवाच्या उंबरठ्यावरील मंडळेही यंदा अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करणार आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उत्सव साजरा करू नये, अशी सूचना पोलिसांनी मंडळांच्या बैठकीत दिली आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना पदाधिकाऱ्याच्या घरात अथवा खासगी जागेत करायची आहे. पटेल चौक गणेशोत्सव मंडळ यंदा ९४ वे वर्ष साजरे करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मंडळ अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करत आहे. यावर्षीही एका गाळ्यामध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाईल. मिरवणुका, रोषणाई किंवा देखावे सादर होणार नाहीत, असे मंडळाचे प्रमुख पदाधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.
मोटर मालक संघदेखील सलग तिसऱ्यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करत आहे. यंदा संघटनेच्या पतसंस्था कार्यालयात श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कॉलेज कॉर्नरवरील भगतसिंग मंडळ, विश्रामबागेतील मंडळे तसेच उपनगरांतही साधेपणाने उत्सव साजरा करणार आहेत. मोजक्याच मंडळांनी महाप्रसादाचे नियोजन केले आहे.
चौकट
४५० हून अधिक मंडळांना नोटिसा
शहर पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत २३९ मंडळे आहेत. विश्रामबागच्या कार्यकक्षेत १४०, तर संजयनगरच्या कक्षेत ८८ मंडळे आहेत. पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सार्वजनिक उत्सवाला मनाई केली आहे. रस्त्यावर मंडप घालता येणार नाहीत. मिरवणुकांनाही प्रतिबंध असेल. तशा नोटिसा मंडळांना बजावल्या आहेत.
कोट
२०१९ मध्ये महापूर, त्यानंतर कोरोना व लॉकडाऊनमुळे उत्सव साधेपणाने साजरा करत आहोत. मिरवणुका, रोषणाईला फाटा दिला आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक परिस्थिती ढासळल्याने उत्सवात लोकसहभागदेखील नसेल. तीन-चार फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना संस्थेच्या कार्यालयातच करणार आहोत.
- मोहन जोशी, अध्यक्ष, मोटर मालक संघ गणेशोत्सव मंडळ