पैसे माेजण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यास १८ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:41+5:302021-04-07T04:28:41+5:30
जत : खराब नोटा बाजूला काढून, पैसे मोजून देण्याचा बहाणा करीत एका भामट्याने शेतकऱ्याला गंडा घातला. बबन मारुती जाधव ...
जत : खराब नोटा बाजूला काढून, पैसे मोजून देण्याचा बहाणा करीत एका भामट्याने शेतकऱ्याला गंडा घातला. बबन मारुती जाधव (वय ४८, रा. तंगडी मळा, वळसंग रोड, जत) यांच्या हातातील नोटा घेऊन त्यातील १८ हजार रुपये काढून घेऊन पलायन केले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार येथील जिल्हा बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.
बबन जाधव यांना जत विकास सर्व सेवा सहकारी सोसायटीकडून ८० हजार रुपये पीककर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी ६० हजार रुपये खात्यातून काढून घेण्यासाठी ते मंगळवारी बँकेत आले होते. शंभर रुपयाच्या नोटांचे दहा हजार रुपये व पाचशे रुपयाच्या नोटांचे पन्नास हजार रुपये, असे एकूण ६० हजार रुपये त्यांनी बँकेतून काढलेे. नोटा हातात घेऊन मोजत असताना एक जण त्यांच्याकडे आला. मिळालेल्या पैशात खराब नोटा आहेत. त्या तुम्हाला बाजून काढून व्यवस्थित मोजून देतो असा बहाणा करून त्याने जाधव यांच्या हातातून पैसे घेतले. पाचशे रुपयाच्या बंडलमधील ५० हजार रुपयापैकी १८ हजार रुपये स्वतःजवळ ठेवून घेऊन उर्वरित बत्तीस हजार रुपये त्याने जाधव यांच्या हातात दिले. त्यानंतर ताे निघून गेला. काही वेळानंतर हा प्रकार जाधव यांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत अज्ञात भामट्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.