सुशोभिकरणासाठी नेत्यांची गांधीगिरी
By Admin | Published: December 7, 2015 12:01 AM2015-12-07T00:01:30+5:302015-12-07T00:19:39+5:30
आंबेडकर पुतळा : गुलाब देऊन पदाधिकाऱ्यांचे स्वागत
अशोक पाटील--इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी दलित नेते, विविध संघटनांनी आंदोलने, निवेदने दिली आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत पालिका पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन हे काम १४ एप्रिल २०१६ पर्यंत (डॉ. आंबेडकर यांची १४५ वी जयंती) पूर्ण करावे, अशी विनंती केली.
इस्लामपुरात नगरपरिषदेच्या फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी शहरातील दलित नेत्यांनी आंदोलने, निवेदने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तहसील कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीपासून ते परिसराच्या सुशोभिकरणासाठी अनेक अडचणी आल्या आहेत. सध्या हे काम संथगतीने सुरु आहे. हे काम जलद होण्यासाठी शहरातीलच काही नेत्यांनी आंदोलने केली. परंतु पालिका प्रशासनाने त्याची कधीही गंभीर दखल घेतली नाही. कधी ठेकेदार नाही, तर कधी सुशोभिकरणासाठी लागणारे साहित्य नाही, तर कधी निधी नाही, अशी कारणे देऊन हे काम दिवसेंदिवस रखडत ठेवले आहे.
ज्या दलित नेत्यांनी यासाठी आंदोलने केली, त्यातील काही दलित नेते बदनामीच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे शहरातील दलित नेते आणि चळवळ थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी पार्टीचे सदस्य महेश परांजपे यांनी आंबेडकरपे्रमी युवकांना सोबत घेऊन गावातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढून पुतळा परिसर सुशोभिकरणाचा मुद्दा उचलून धरला होता.
रविवार, दि. ६ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. दिनेश येडेकर, प्रकाश कांबळे, अजित पन्हाळे, प्रकाश एटम, संजय बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांची उपस्थिती होती, तर पालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि इतर नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. यावेळी दलित नेत्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत उपस्थित पालिका पदाधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १४५ वी जयंती साजरी होत आहे. तोपर्यंत तरी सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली.
पुतळा सुशोभिकरणासाठी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी लागणारा दगड मध्यप्रदेशातून आणावा लागणार आहे. मध्यंतरी या कामासाठी लागणारा निधी पालिकेकडे उपलब्ध नाही. सध्या पालिकेकडे निधी असला तरी, साहित्य उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. काही महिन्यात हे काम पूर्ण करू.
- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपरिषद.