Sangli: विट्याचा लाडका ‘गणेश’ उपचारासाठी जाणार गुजरातला, यात्रा कमिटीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:31 PM2023-11-03T13:31:49+5:302023-11-03T13:35:54+5:30

विटा : विटेकर नागरिकांचे जीवापाड प्रेम असलेला आणि विटा शहराचे वैभव असलेला येथील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या ‘गणेश’ हत्तीवर देशातील ...

Ganesh elephant from Vita will go to Gujarat for treatment | Sangli: विट्याचा लाडका ‘गणेश’ उपचारासाठी जाणार गुजरातला, यात्रा कमिटीचा निर्णय

Sangli: विट्याचा लाडका ‘गणेश’ उपचारासाठी जाणार गुजरातला, यात्रा कमिटीचा निर्णय

विटा : विटेकर नागरिकांचे जीवापाड प्रेम असलेला आणि विटा शहराचे वैभव असलेला येथील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या ‘गणेश’ हत्तीवर देशातील सर्वात मोठ्या असलेल्या गुजरातच्या जामनगर येथील राधाकृष्ण टेंपल ट्रस्टच्या हत्ती उपचार केंद्रात पाठविण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष माजी आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

माजी आ. पाटील म्हणाले, भैरवनाथ यात्रा कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी यात्रा कमिटीसाठी पहिल्यांदा ‘मोहन’ नावाचा हत्ती आणला. त्याच्यावर गेली २० वर्षे विटेकरांनी प्रेम केले. मात्र, दुर्दैवाने सन २००० ला त्याचा मेंदूज्वराने मृत्यू झाला. तेव्हापासून विटा शहरातील नागरिकांना हत्तीचे दर्शन दुर्मीळ झाले. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सन २००७ ला बिहारच्या पाटणाजवळ असलेल्या सोनपूर येथून चार वर्षे वयाच्या ‘गणेश’ हत्तीला आणण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत ‘गणेश’ शहराचे वैभव म्हणून वावरत होता. 

परंतु, गेल्या ४ ते ५ महिन्यापासून त्याला मणक्याचा विकार व पायाला जखमा होऊ लागल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्नाटकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. परंतु, त्याचा आजार जास्तच बळावत गेला. त्यानंतर हत्तीवर उपचार करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या गुजरातच्या जामनगर येथे असलेल्या राधाकृष्ण टेंपल ट्रस्टच्या हत्ती उपचार केंद्राची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ‘गणेश’वर उपचार करून त्याला या आजारातून बाहेर काढण्याची ग्वाही दिली आहे.

त्यामुळे आम्ही विटेकरांच्या लाडक्या ‘गणेश’ला पुढील उपचारासाठी गुजरातच्या जामनगरला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या वन विभागाच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘गणेश’ बरा होऊन पुन्हा विटा शहराच्या वैभवात भर टाकणार आहे, अशी अपेक्षा सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव आप्पा पाटील, गंगाधर लकडे, शरद पाटील, विलास कदम, विश्वनाथ कांबळे, कैलास भिंगारदेवे, भरत कांबळे, बाळासाहेब निकम, सुभाष मेटकरी उपस्थित होते.

Web Title: Ganesh elephant from Vita will go to Gujarat for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.