बामणीत मुस्लिम समाजाचा गणेशोत्सव--हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:34 PM2017-09-02T18:34:08+5:302017-09-02T18:43:19+5:30
बाळासाहेब शिंदे/पारे (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने गणेशोत्सव साजरा करीत नवव्या वर्षीही परंपरा जोपासली आहे. येथील मुस्लिम समाज एकत्रित येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा-अर्चा करतो. शिवाय गौरी पूजनासह गणेश विसर्जनापूर्वी महापूजाही घातली जाते.
बामणी येथील हिंदू-मुस्लिम एकता गणेश मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार यांनी २००८ ला पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लिम गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मुस्लिम समाजातील भाविकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करतात. दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती, गोड नैवेद्य व दररोज महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर संगीत खुर्ची, गोणपाट उडी, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धाही मुस्लिम समाजातील गणेशभक्त आयोजित करतात.
हा गणेशोत्सव तालुक्यात आदर्शवत ठरत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. बामणीतील ग्रामस्थही मुस्लिम समाजाच्या सणात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. महाआरतीत मुस्लिम आणि हिंदू ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.गणेश विसर्जनापूर्वी महापूजा आयोजित केली जाते.
मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार असून, खलील शिकलगार, हारुण शिकलगार, शकील शिकलगार, चंदन शिकलगार, गणी शिकलगार, सूरज शिकलगार, युनूस मुलाणी, जुबेर मुलाणी, आरफान शिकलगार, इरफान शिकलगार, हसन शिकलगार, प्रशांत माने, सतीश माळी, सुखदेव शिंदे, कुणाल शिंदे, ऋषी जगताप, राजू शिकलगार, बशीर मुलाणी, मलिक मुलाणी, ईलाही शिकलगार, अरमान शिकलगार, अमीर शिकलगार, समीर शिकलगार व वसीम मुलाणी आदी कार्यकर्ते सहभागी होतात.