चिनी बनावटीच्या सजावट साहित्यांवर गणेशभक्तांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 05:41 PM2017-08-19T17:41:05+5:302017-08-19T17:41:59+5:30
गणेशोत्सव, दिवाळी व अन्य उत्सवातील सजावटीसाठी चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. मात्र, सीमारेषेवर चीनच्या कुरापती पाहता यंदा देशवासीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अविनाश कोळी/सांगली, दि. 19 - गणेशोत्सव, दिवाळी व अन्य उत्सवातील सजावटीसाठी चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. मात्र, सीमारेषेवर चीनच्या कुरापती पाहता यंदा देशवासीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंवर यंदा गणेशभक्तांचीही वक्रदृष्टी पडली आहे. सांगलीतील बाजारात चायनीज इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना 440 व्होल्टचा झटका बसला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 85 टक्के आवकही कमी झाली आहे.
चीन आणि भारतामधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. बाजारात अनेकठिकाणी चिनी बनावटीच्या वस्तूंना विरोध दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. केवळ सांगलीच्या बाजारपेठेत दरवर्षी गणेशोत्सवात चायनीज माळा, फोकस लाईट, लेझर प्रोजेक्टर अशा विविध चायनीज इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
दिवाळीतही अशीच परिस्थिती असते. यंदा मात्र गणेशोत्सव काळात या चिनी बनावटीच्या वस्तूंची आवक जवळपास बंदच झाल्यात जमा आहे. सध्या सांगलीच्या बाजारात 15 टक्केच चायनीज माळा उपलब्ध आहेत. येथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे विक्रेते अमोल चिवटे म्हणाले की, आमच्याकडे यंदा चायनीज वस्तूंची आवक पूर्णपणे बंद आहे. भारतीय बनावटीचेच साहित्य उपलब्ध आहेत. बाजारात सध्या चिनी वस्तूंविरोधात नाराजीही जाणवत आहे. गणपती पेठेतील विक्रेते गोपीचंद सेवलानी म्हणाले की, यंदा आमच्याकडे केवळ भारतीय बनवाटीच्याच वस्तू उपलब्ध आहेत. आरासाच्या अन्य साहित्यांमध्येही चिनी बनावटीच्या वस्तूंना मागणी कमी झाली आहे. भारतीय बनावटीच्या वस्तू तुलनेनं महाग आहेत, मात्र त्यांनाच अधिक मागणी होत असल्याचा अनुभवही येथील विक्रेत्यांनी मांडला.