‘ती’चा गणपती उपक्रमाची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:47 PM2017-09-04T23:47:08+5:302017-09-04T23:47:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘ती’चा गणपती गणेशोत्सवाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सांगता उत्साहात करण्यात आली. या उपक्रमाचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील शेकडो घरांमध्ये चांगल्या परंपरेचा श्रीगणेशा करण्यात आला.
गणेशोत्सव फक्त पुरुषांनीच साजरा करावा, असा नियम नाही. त्यामुळे आपल्या ‘ती’लाही त्यात मान देण्याच्यादृष्टीने ही संकल्पना सत्यात उतरविण्यात आली. ‘ती’ला गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा, ‘ती’ला गणरायाची पहिली पूजा करण्याचा मान देऊन नव्या सामाजिक अभिसरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या विचाराअंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, पाच दिवस आरती, पूजा यामध्ये ‘ती’ला म्हणजे स्त्रीला मान मिळावा, म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले.
‘लोकमत भवन’, वसंतदादा औद्योगिक वसाहत, माधवनगर रोड येथे हा ‘ती’चा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमात स्त्रीशक्तीचा जागर म्हणून विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करण्यात आले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांसह पोलिस, वकील महिलांच्याहस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या व त्याची माहिती मिळालेल्या जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांनी त्यांच्या घरीही ‘ती’चा गणपती ही परंपरा म्हणून स्वीकारली. शेकडो महिलांनी मूर्ती प्रतिष्ठापना, गणरायाचे विसर्जन, दररोजची आरती, पूजा अशा गोष्टी स्वत:च्याहस्ते केल्या. ‘लोकमत’लाही त्यांनी धन्यवाद दिले.
‘लोकमत’, ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ला धन्यवाद...
सांगली जिल्ह्यातील महिलांनी ‘लोकमत’ आणि ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’च्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्साहाच्या अनेक लाटा मनांमध्ये घेऊन महिलांनी सहभागही नोंदविला. सार्वजनिक स्तरावरील या उपक्रमाला अनेकांनी घरी आणले. सांगली जिल्ह्यातील विविध कुटुंबियांनी गणरायाची प्रतिष्ठापना, विसर्जन व अन्य पूजाविधीही ‘ती’च्याहस्ते केले. यामध्ये सांगलीच्या श्रेया पवार, ऐश्वर्या पवार, पे्रमलता साळी, सुनीता पवार, सारिका पोतदार, वासंती पवार, सोनाली सावंत, अमिषा खोत, नीता मोरे, श्रावणी माने, राजश्री पाटील, श्रुती उपळावीकर आणि श्रेया हेर्लेकर यांनीच गणरायाची प्रतिष्ठापना केली. सांगलीच्या तेजश्री सावंत, श्रेया पवार, नीता मोरे, मिरजेच्या सुचेता मलवाडे आणि सांगलीच्या कलावती पवार यांनी उत्सव काळात गणरायाची आरती व पूजा करून त्याची छायाचित्रे ‘लोकमत’ला पाठविली आणि ही संकल्पना समाजात रुजविल्याबद्दल ‘लोकमत’ आणि ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ला धन्यवाद दिले.
विविध उपक्रम...
‘ती’चा गणपती उपक्रमाअंतर्गत सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमधील ‘लोकमत’ कार्यालयात विविध स्पर्धा व उपक्रम पार पडले. यामध्ये पारंपरिक खेळ, थाळी सजावट, मोदक स्पर्धा, गणेश रेखाटन, महाराष्टÑीयन वेशभूषा, अथर्वशीर्ष पठण आदी स्पर्धा पार पडल्या. ‘आपली संस्कृती’ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमातून महिलांनी सोन्याची नथ, पैठणी व अन्य बक्षिसे जिंकून आनंद साजरा केला. सर्वच कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.