परदेशात जहाजावर गणपती बाप्पाचा गजर, चीन प्रवासात उत्सवाचे आकर्षण; मराठमोळ्या युवकांचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:52 PM2023-09-21T16:52:13+5:302023-09-21T16:53:37+5:30
सहदेव खोत पुनवत (जि. सांगली ) : ‘मर्चंट नेव्ही’च्या माध्यमातून परदेशात जहाजावर नोकरी करणाऱ्या मराठमोळ्या युवकांकडून सिंगापूर ते चीनदरम्यान ...
सहदेव खोत
पुनवत (जि. सांगली) : ‘मर्चंट नेव्ही’च्या माध्यमातून परदेशात जहाजावर नोकरी करणाऱ्या मराठमोळ्या युवकांकडून सिंगापूर ते चीनदरम्यान प्रवासात असणाऱ्या हुगो एन. या जहाजावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे युवक मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून नोकरीच्या निमित्ताने परदेशात जात असतात. सध्या मुंबईच्या मरीन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे हुगो एन. हे जहाज सिंगापूर ते चीनदरम्यान प्रवास करीत आहे. या जहाजावर कॅप्टन अजितकुमार खामकर (सातारा) यांच्या नेतृत्वाखाली पुनवत (ता. शिराळा) येथील जितेंद्र जाधव, सुनील कदम यांच्यासह संतोष काळे, संभाजी चांदणे, अनिकेत वाघ, श्रीकांत भोसले, वरुण प्रभुदेसाई, राहुल माने आदी मराठमोळे युवक कार्यरत आहेत.
सध्या दक्षिण चीनच्या समुद्रातील जहाजावर मराठमोळ्या युवकांकडून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जहाजाच्या डेकवरून मिरवणूक काढत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत मोठ्या आनंदात जहाजावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जहाजावर उपलब्ध साहित्यातून गणपतीची सुंदर आरास केली आहे. प्रवासात दररोज गणपती पूजन, आरती व धार्मिक विधी केले जात आहेत.
महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आम्ही जरी परदेशात असलो, तरी सांस्कृतिक परंपरेचे जतन आम्हाला करता येत आहे. हा उत्सव सातासमुद्रापार साजरा करताना खूप आनंद होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केला जात असून, ‘श्री’चे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. - अजितकुमार खामकर, कॅप्टन