सांगलीत गणेशोत्सवाच्या बाजाराला महागाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:42 PM2019-09-01T23:42:40+5:302019-09-01T23:42:44+5:30
सांगली : उत्सवातील अनेक घटकांना स्पर्श करीत महागाईने बाजारात ठाण मांडल्यामुळे, यंदा भाविकांमध्ये उत्सवाचा उत्साह असतानाच महागाईबद्दलची नाराजीही स्पष्टपणे ...
सांगली : उत्सवातील अनेक घटकांना स्पर्श करीत महागाईने बाजारात ठाण मांडल्यामुळे, यंदा भाविकांमध्ये उत्सवाचा उत्साह असतानाच महागाईबद्दलची नाराजीही स्पष्टपणे दिसत होती. गणपतीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कापूर महागाईला चिकटूनच आहे. फुलांच्या आणि पर्यायाने हारांच्या दरातही मोठी वाढ झाली असून आरास साहित्याचेही दर वाढले आहेत.
दरवर्षी केवळ मूर्तींच्या किमतीत थोडी वाढ होत असते. मात्र पूजा साहित्य व आरास साहित्याच्या दरात फारशी वाढ दिसत नाही. पण यंदा अनेक कारणांनी महागाईने डोके वर काढले आहे. महापुराचा मोठा परिणाम पूजा साहित्यावर दिसून येत आहे. त्यामुळे भाविकांनी वाढत्या महागाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात परंपरेप्रमाणे लागणाऱ्या सर्व गोष्टी खरेदी कराव्या लागतात. त्यात कधीही काटकसर केली जात नाही. त्यामुळे महागाईची झळ सोसतच उत्सवाचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूजा साहित्यात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या कापराचा दर गतवर्षापासून शिखरावरच आहे. महागाईची संगत कापूर सोडण्यास तयार नसल्याने कापराचे दर ऐकून भाविकांना धक्का बसत आहे. २0१७ मध्ये ३०० रुपये प्रति किलो असणारा कापूर २0१८ मध्ये तिप्पट दरवाढ घेऊन दारी आला होता. यावर्षीही कापूर १२०० रुपये किलोने होलसेल बाजारात विकला जात आहे. किरकोळ बाजारातील विक्री तर आणखी महाग झाला आहे.
फुलांनीही दरात उसळी घेतली आहे. शेवंती, झेंडू तसेच पांढºया फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे छोट्या-मोठ्या हारांच्या किमतीही वाढल्या आहेत. फुलांची आरास करणेही परवडत नसल्याची भावना भाविक व्यक्त करीत आहेत. गतवर्षी बंदीमुळे थर्माकोलच्या कमानी बाजारातून गायब झाल्या होत्या. यंदा दबक्या पावलांनी थर्माकोलचे आरास साहित्य बाजारात आले आहे. त्याला पर्याय म्हणून फायबर, लाकडी, फोमच्या कमानी बाजारात आल्या आहेत.