दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:40+5:302021-02-16T04:27:40+5:30
सांगली : मिरज परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. ...
सांगली : मिरज परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. पोलिसांनी पाठलाग करून चाैघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या टोळीकडून राज्यातील दरोड्यासह अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
निमजी इगलीस काळे (६२), परारी उर्फ गांगुली निमजी काळे (१९), सोमनाथ निमजी काळे (२०), विशाल निमजी काळे (२४, सर्व रा. कोडगाव तांडा, धुपखेडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असून सचिन काळे हा पसार झाला आहे.
शहरात वाढलेल्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर चोऱ्यांना आळा घालत आरोपींवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवारी रात्री पथक मिरजेत गस्तीवर असताना, मिरज शास्त्री चौक ते म्हैसाळ रोडवर असलेल्या एका दुकानाच्या मागे पाचजण संशयितरित्या लपून बसल्याची माहिती पथकास मिळाली. पथक त्या दिशेने जात असतानाच, चाहूल लागताच सर्व संशयित पळू लागल्याने पथकाने पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले. तर एकजण पसार झाला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे हातोडी, रॉड, ब्लेड, कोयता, मिरची पूड आदी साहित्य मिळून आले. यावेळी त्यांनी मिरज परिसरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्यावर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुलदीप कदम, उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
अन्य गुन्हेही उघडकीस येणार
औरंगाबाद जिल्ह्यातील ही टोळी मिरजेत दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात सापडली. संशयितांवर यापूर्वीही गुन्हे असल्याची शक्यता असून राज्यातील अन्य ठिकाणी केलेले गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केला.