सांगलीत महिला डॉक्टरला लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:28+5:302021-09-12T04:31:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील वयोवृध्द महिला डॉक्टरच्या घरात घुसून कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीस विश्रामबाग पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील वयोवृध्द महिला डॉक्टरच्या घरात घुसून कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीस विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. ताब्यात घेतलेल्या टोळीकडून २५ तोळे सोन्यासह अन्य असा सात लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमित चंद्रकांत पाचोरे (वय २८), सचिन शिवाजी फोंडे (२७, दोघेही रा. नांद्रे ता. मिरज), रोहित देवगोंडा पाटील (२३, रा. जैन बस्तीपाठीमागे, वसगडे, ता. पलूस), निखिल राजाराम पाटील (३१, रा. खटाव ता. पलूस) आणि पायल युवराज पाटील (३१ रा. चांदणी चौक, सांगली) अशी संशयितांची नावे असून संशयित पायल पाटील या महिलेने दिलेल्या ‘टिप’नुसार ही लूट केल्याचे संशयितांनी कबूल केले.
येथील हॉटेल सदानंदजवळच्या घरी डॉ. नलिनी नाडकर्णी (८७) एकट्या असताना, तिघांनी घरात प्रवेश करत कोयत्याच्या धाकाने २५ तोळे सोने व रोख रक्कम चोरून नेली होती. यानंतर विश्रामबाग पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विश्रामबाग पोलिसांचे पथक याचा तपास करत असताना, संशयित महिला पायल पाटील व निखिल पाटील यांच्या सांगण्यावरून ही लूटमार केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगलीतून संशयितांना ताब्यात घेतले. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकाराची पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेत तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सलग सात दिवस तपास पूर्ण करत विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
चाैकट
मुद्देमाल जप्त
वयोवृध्द महिला घरी एकटीच असल्याची खात्री करून आणि टिप देऊनच हा प्रकार केला होता. संशयितांकडून पाच लाख ९७ हजार ५०० रुपयांचे साेन्याचे दागिने, रोख आठ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेल्या एक लाखाच्या मोटारसायकली, ३७ हजाराचे मोबाईल आणि कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.