टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

By admin | Published: July 5, 2016 11:39 PM2016-07-05T23:39:17+5:302016-07-06T00:20:32+5:30

खून का बदला खून : पोलिसांच्या कारवाईला मरगळ आल्याने गुंडांचे फावले

A gang of goons 'game' | टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

Next

सचिन लाड -- सांगली -‘खून का बदला खून’ आणि ‘वर्चस्व’ या दोन मुद्यांवरून शहरात गेल्या दहा वर्षांत अनेकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. यातून डझनभर गुंडांची ‘गेम’ करण्यात आली. एकापाठोपाठ एक अशा विरोधी टोळीतील गुंडांचा खात्मा करण्याची मालिकाच सुरू आहे. भरदिवसा खून करून हे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सहिसलामत बाहेर येत असल्याने टोळीयुद्ध धगधगतच आहे. गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढता राहिल्याने ‘नाट्यपंढरी’ अशी सांगलीची ओळख लोप पावत आहे.
सोमवारी रवींद्र कांबळे या गुंडाचा गोकुळनगरमध्ये भरदिवसा खून झाल्याने शहरातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुंड अकबर आत्तार, दाद्या सावंत, अजय माने, रफिक शेख, विठ्ठल शिंदे, संजय पोतदार, सोमनाथ सकपाळ, विजय पवार, मिर्झा, अशोक सरगर, रशीद शेख अशा अनेक गुंडांचा टोळीयुद्धातून खात्मा झाल्याचे सांगलीकरांनी पाहिले आहे. एखाद्या घटनेचा अपवाद सोडला, तर बहुतांशी खून भरदिवसा झाले आहेत. प्रत्येकाचा खून करताना दगडाचा वापर करण्यात आला. राजकीय आश्रय, अवैध व्यावसायिकांचे पाठबळ या जोरावर उपनगरांत गुंडांच्या टोळ्या आजही सक्रिय आहेत. ते खिशात किंवा कमरेला नेहमीच हत्यार लावून असतात. शहरात किंवा ते राहात असलेल्या भागात वर्चस्व कोणाचे? या मुद्यावर गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष राहिला आहे. संजयनगर, गोकुळनगर, शंभरफुटी रस्ता, जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, संपत चौक, अहिल्यानगर, प्रेमनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, शामरावनगर ही ठिकाणे नेहमीच संवेदनशील राहिली आहेत. सातत्याने याठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न व मारामारीच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांत टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’ झाली आहे. एक-दोन खुनाचे अपवाद सोडले तर, अन्य गुन्ह्यांतून हे गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेणे, पोलिसांच्या निष्क्रियतेचा लाभ घेणे, दहशत माजवून साक्षीदारांवर दबाव आणणे असे प्रकार या टोळ्यांकडून होत आहेत. गुंडाविरुद्ध तक्रार आली तर पोलिसांकडून तातडीने कारवाईची पावले उचलली जात नाहीत. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जात नाही. त्यांना तपासले जात नाही. परिणामी गल्ली-बोळात नवीन फाळकूट दादा तयार होत आहेत. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर या पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा नुसती कागदावरच अस्तित्वात आहे. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची कारवाई कधीच प्रकर्षाने दिसत नाही. प्रलंबित गुन्ह्यांचाही त्यांना छडा लावता येत नाही.



गुन्हेगारांचे डोके पुन्हा वर
तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांचा जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाल संघर्षाचा राहिला. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात त्यांचा हातखंडा होता. कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची ते नेहमी माहिती ठेवत. त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असे. एखादी तक्रार आली की संबंधित गुंडास तातडीने आत टाकण्याचे आदेश देत. त्यांना घाबरून अनेक टोळ्यांतील गुन्हेगार शांत होते. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने विविध मोहीम राबवत. त्यांची बदली होताच म्हमद्या नदाफसह अनेक टोळ्यांनी डोके वर काढले. सध्याचे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना पदभार घेऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यांचीही ‘डॅशिंग’ पोलिसप्रमुख म्हणून ओळख आहे. त्यांनी कारवाईची दिशा यापूर्वीच स्पष्ट केली आहे.

Web Title: A gang of goons 'game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.