विश्रामबागला पती, दिरासह बुवाकडून सामूहिक बलात्कार
By घनशाम नवाथे | Published: November 6, 2024 10:35 PM2024-11-06T22:35:40+5:302024-11-06T22:35:47+5:30
मूल होत नसल्यामुळे कृत्य; अर्जुनवाडच्या बुवासह तिघांना अटक
घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मूल होत नसल्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडून विवाहितेच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील बुवा या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पती, दीर आणि बुवा काशीनाथ रामा उगारे (वय ४०, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ) याला अटक केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला आहे. विवाहानंतर मूल होत नसल्यामुळे तरुणीचा छळ होऊ लागला. कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्यामुळे घरात सतत बुवा, महाराज यांना आणले जात होते. बुवाचे पाय धुऊन पाणी प्यायला लावले जात होते. मूल होत नाही म्हणून तरुणीचा पती, दीर, सासू, सासरे हे छळ करत होते. विश्रामबाग येथील घरी तसेच अर्जुनवाड गावातील मंदिरात तिचा छळ सुरू होता.
काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची सासरची मंडळी मोटारीतून जात होती. तेव्हा वाटेत मोटार बंद पडली. त्यांनी अर्जुनवाड येथील बुवा काशीनाथ उगारे याला मोबाइलवरून कॉल केला. त्याला हकिगत सांगितली. तेव्हा त्याने पीडितेच्या कुटुंबीयांना तुमची सून अपशकुनी आहे. तिचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी धार्मिक विधी करण्याचे ठरले.
दुसऱ्या दिवशी विश्रामबाग येथे बुवा काशीनाथ उगारे पीडित तरुणीच्या घरी आला. पूजापाठ झाल्यानंतर तरुणीस अंघोळ करण्यास सांगितले. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि बुवा काशीनाथ यांनी पीडितेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडिता माहेरी गेली होती. काही दिवस ती रडतच होती. अखेर तिच्या आईने वारंवार विचारणा केल्यानंतर तिने घडलेली हकिगत सांगितली. त्यामुळे माहेरच्या मंडळींना धक्का बसला.
अखेर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि बुवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच सामूहिक बलात्काराबद्दल पती, दिरासह बुवा काशीनाथवर गुन्हा दाखल केला. पती, दीर, बुवा काशीनाथला अटक केली आहे. तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.