टोळक्याचा हाॅटेलमध्ये धिंगाणा, तोडफोड करून दोन लाखांचे नुकसान, १५ जणावर गुन्हा
By शीतल पाटील | Published: February 24, 2023 09:10 PM2023-02-24T21:10:28+5:302023-02-24T21:10:35+5:30
याप्रकरणी पंधरा जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सांगली : विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथील हाॅटेल आर्यामध्ये गुरुवारी टोळक्याने धिंगाणा घालत तोडफोड केली. हल्लेखोरांनी दोन ते अडीच लाखांचे नुकसान केले. हॉटेलच्या गल्ल्यातील २२ हजारांची रोकडही लंपास केली. खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. गुरुवारी दुपारी अडीच ते रात्री आठ वाजेपर्यंत टोळक्याचा धिंगाणा सुरू होता. याप्रकरणी पंधरा जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याप्रकरणी गणेश पाटील, सोहेल शेख, नदीम शेख, अरुण चव्हाण, विनायक दुधाळ, रिक्षावाला यश दुधाळ, बापशा चव्हाण यांच्यासह अनोळखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक आकाश संतोष शिंदे (वय २६, रा. स्फूर्ती चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हसनी आश्रम येथे महेश कर्णी यांचे हॉटेल आर्या आहे. फिर्यादी शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी हॉटेल चालवण्यासाठी घेतले आहे. हॉटेलमध्ये १४ कामगार आहेत. गुरुवारी दुपारी अडीच्या सुमारास संशयित गणेश पाटील, नदीम शेख व त्यांच्यासोबत पाच जण हॉटेलमध्ये आले. त्यावेळी संशयितांनी जेवणाची मागणी केली. हॉटेल चालकाने नकार दिला. त्यानंतर पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शिंदे यांनी घटनेबाबत गणेश पाटील याला जाब विचारल्यानंतर संशयिताने दमबाजी केली.
दुपारी चारच्या सुमारास हॉटेलमध्ये काही जणांनी लोखंडी रॉड घेऊन तोडफोड केली. सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गणेश पाटील व त्याचे साथीदार बबलू माने, सोहेल शेख दिसून आले. त्यानंतर पावणे सातच्या सुमारास पुन्हा संशयितांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. संशयितांनी हॉटेलमधील सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केले आहे. गल्ल्यातील २२ हजारांची रक्कमही चोरी केली. दरम्यान, घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील अधिक तपास करत आहेत.
माजी नगरसेविकेच्या पतीची मध्यस्थी
दरम्यान, या तोडफोड प्रकरणात माजी नगरसेविकेच्या पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तो सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली होती. अखेर फिर्यादीने शपथपत्र देत त्याचा तोडफोडीशी संबंध नसल्याचे सांगितले.