दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By Admin | Published: July 9, 2014 12:26 AM2014-07-09T00:26:01+5:302014-07-09T00:52:32+5:30
वैजापूर : दरोडा टाकण्याच्या हेतूने फिरणाऱ्या टोळीचा ग्रामस्थांनी पाठलाग करून चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना तालुक्यातील नागमठाण येथे मंगळवारी दुपारी घडली
वैजापूर : दरोडा टाकण्याच्या हेतूने फिरणाऱ्या टोळीचा ग्रामस्थांनी पाठलाग करून चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना तालुक्यातील नागमठाण येथे मंगळवारी दुपारी घडली. हे चौघेही राहुरी तालुक्यातील आहेत.
संजय लहू सूर्यवंशी (२८, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी), माधव कोंडीराम बर्डे (२५, रा. बारगाव नांदूर, ता. राहुरी), अनिल गोरख बर्डे (१९) व राहुल अशोक बर्डे (१९), दोघेही रा. आरडगाव, ता. राहुरी अशी पकडण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
दरोडेखोरांची ही टोळी श्रीरामपूर हद्दीतून गोदावरी ओलांडून तालुक्यातील नागमठाण शिवारात पोहोचली.
खानापूर येथील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून तालुक्यातील नागमठाण शिवारात या टोळीतील चौघांना पकडले. त्या चौघांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. रयतुवार, फौजदार भास्कर सोनवणे, पोलीस नाईक सुनील ढेरे, अक्रम पठाण, रामचंद्र बोंद्रे, राहुल ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या चौघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)
१८ ते ३० वयोगटातील युवकांची टोळी
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर शिवारात १८ ते ३० वयोगटातील युवकांची ६-७ जणांची टोळी संशयितरीत्या फिरत असताना ग्रामस्थांनी त्यांना हटकले. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना चोप देण्यास सुरुवात केल्याने युवकांनी तेथून पोबारा केला.