धनगावात घराणेशाही विरुध्द तरुणाई मैदानात
By admin | Published: October 30, 2015 11:58 PM2015-10-30T23:58:23+5:302015-10-31T00:01:44+5:30
गावातील तरुणांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायतीकडून मागविलेली माहिती, लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी, त्यावर दाखल झालेल्या तक्रारी, कारवाईचा बडगा हे प्रचाराचे मुद्दे
शरद जाधव -- भिलवडी--पलूस तालुक्यातील धनगाव (तावदरवाडी) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही जपत गेली पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या ज्येष्ठ नेतेमंडळींविरोधात तरुण पिढी मैदानात उतरली आहे. सत्ताधारी विरोधात सामान्य जनता, असा रंगतदार सामना होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी सदस्यसंख्या नऊ असून, खुल्या प्रवर्गातील महिला हे सरपंच पदासाठी आरक्षण आहे. धनगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी गटाचे आठ, तर विरोधकांचा केवळ एक सदस्य आहे. गावातील तरुणांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायतीकडून मागविलेली माहिती, सत्ताधाऱ्यांनी पुरविलेल्या माहितीवरून लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी, त्यावर दाखल झालेल्या तक्रारी, प्रशासनाने उगारलेला कारवाईचा बडगा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे तरुणांच्या परिवर्तन पॅनेलने पुढे केले आहेत. त्यांनी राजकारणात नवख्या चेहऱ्यांना संधी देत सत्ताधाऱ्यांसमोर पहिल्या टप्प्यातच आव्हान निर्माण केले आहे, तर सत्ताधारी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने नऊ जागांवर आपले उमेदवार उभारले आहेत. काहींनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यपदही भोगले आहे. काही ज्येष्ठ मंडळींवर नाईलाजास्तव मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांनी लाखो रुपयांची विकासकामे हा मुद्दा पुढे केला असला तरीही, विरोधकांनी भ्रष्टाचार व पंधरा वर्षातील विकास कामांचा पंचनामा हा मुद्दा पुढे रेटला आहे. याकडे आता लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
शामराव-भीमराव अन् गणप्या गावडे...
दोन नंबरच्या प्रभागात शामराव आनंदा साळुंखे व भीमराव आनंदा साळुंखे हे दोन सख्खे भाऊ मैदानात उतरले आहेत. ते नेहमीच परस्पराच्या विरोधात वेगवेगळया निवडणुका लढवितात. भरत जाधव यांचा गाजलेल्या ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ या चित्रपटाची कथा या दोन भावांवरच आधारित होती.