उसाच्या शेतात तीस गुंठ्यामध्ये केली होती गांज्याची लागवड, शिपूरला एक कोटीचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:02 PM2022-08-27T14:02:06+5:302022-08-27T14:02:33+5:30
शेतमालक बाबर दिव्यांग. पोलिसांनी घेतले ताब्यात
मिरज : शिपूर (ता. मिरज) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी उसाच्या शेतात छापा टाकून तेथे लागवड केलेला तब्बल एक टन ओला गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातील किंमत एक कोटी रुपये आहे. याप्रकरणी शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
शिपूर येथे नंदकुमार दिनकर बाबर याच्या तीस गुंठे उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी सकाळी सहा वाजता तेथे छापा टाकला. शेतात उसात लावलेली एक कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किमतीची ४८६ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाचे वजन १०५९ किलो आहे. यावेळी उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजा लागवड केल्याचे आढळले. उसातील गांजाची झाडे शोधून काढण्यात आली.
सकाळी सहा वाजता सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई सुरू केल्यानंतर ग्रामीण पोलीसही तेथे मदतीसाठी पोहोचले. शेतातील गांजाची झाडे तोडून पंचनामा करून वजन करण्याचे काम दिवसभर सुरू होते. नंदकुमार बाबर या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. शिपूरमध्ये शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
शेतमालक बाबर दिव्यांग आहे. मात्र त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची शेती का केली, याची चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही गांजाच्या शेतीवरील पहिलीच मोठी कारवाई आहे.