मंजुषा पाटील यांना गानसरस्वती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:53+5:302021-01-08T05:24:53+5:30
सांगली : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे देण्यात येणारा गानसरस्वती पुरस्कार यंदा गायिका व गुरुकुल संगीत विद्यालयाच्या संचालिका मंजुषा पाटील ...
सांगली : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे देण्यात येणारा गानसरस्वती पुरस्कार यंदा गायिका व गुरुकुल संगीत विद्यालयाच्या संचालिका मंजुषा पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ५० वर्ष वयाच्या आतील प्रथितयश कलाकारांना दिला जातो. मंजुषा पाटील या पं. चिंतुबुवा म्हैसकर, पं. द. वि. काणेबुवा, डॉ. विकास कशळकर, पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा असल्याने संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षापासून सांगलीतील चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सुरू झाले. त्यांनी अखिल भारतीय बालगंधर्व संगीत महाविद्यालयातून मास्टर ऑफ आर्टस केले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित द. वि. काणेबुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांच्या निधनानंतर पाटील यांनी पं. नरेंद्र कणेकर आणि शुभदा पराडकर यांच्याकडे काही काळ संगीत शिक्षण घेतले. लग्नानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी डॉ. विकास कशाळकर यांच्याकडे संगीतसाधना सुरू केली. सध्या त्या पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे शिक्षण घेत आहेत.