सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
By शीतल पाटील | Published: January 18, 2023 06:59 PM2023-01-18T18:59:49+5:302023-01-18T19:01:09+5:30
नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
सांगली : कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ कचरा, लाकडे, बाटल्या, निर्माल्याचा ढीग साचला आहे. नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कोंबड्या व इतर प्राण्यांचे अवयवही दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील अमरधाम स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या नदीपात्रात जेमतेम पाणी आहे. काही दिवसांपूर्वी पाणी सोडले असले तरी दरवाजे उघडलेले नाहीत. परंतु, दरवाजे गंजलेले असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा अडकला आहे. त्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच वाहून आलेली लाकडे, मृत कोंबड्याही दिसत आहेत. या कोंबड्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी नदीची स्वच्छता करण्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. पण त्या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही. पाटबंधारे विभागानेही येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. आधीच शेरीनाल्याच्या दूषित पाण्यामुळे सांगलीकर त्रस्त आहेत. त्यात आता पाण्यात कचरा साठल्याने प्रदूषणात वाढ हाेणार आहे. रात्रीच्यावेळी मांसाहारी वेस्टही नदीपात्रात टाकले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही पोलिस व महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.