लसणाचे भाव झपाट्याने वाढले, नवी आवक घटली; सततच्या पावसाचा परिणाम

By संतोष भिसे | Published: September 10, 2024 12:31 PM2024-09-10T12:31:11+5:302024-09-10T12:31:41+5:30

संतोष भिसे सांगली : सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा ...

Garlic prices rise sharply Result of continuous rain | लसणाचे भाव झपाट्याने वाढले, नवी आवक घटली; सततच्या पावसाचा परिणाम

लसणाचे भाव झपाट्याने वाढले, नवी आवक घटली; सततच्या पावसाचा परिणाम

संतोष भिसे

सांगली : सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा दरवाढीची मोठी झेप घेतली आहे. सध्याच्या ऐन सणासुदीच्या दिवसांत तो ४०० रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. १०० रुपयांत अवघा पाव किलो लसूण खरेदी करताना गृहिणींचे बजेट ढासळू लागले आहे.

तीन-चार महिन्यांपूर्वीपर्यंत गल्लोगल्ली फिरुन ५० रुपये किलो दराने लसूण विकणारे विक्रेते आता दिसेनासे झाले आहेत. दरवाढीने त्यांनाही किरकोळ विक्री परवडत नसल्याचे सांगत आहेत. सध्याचा किरकोळ बाजारातील भाव आणखी वाढून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. जुन्या लसणाची आवक संपली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने ठिय्या मारल्याने नवा लसूण बाजारात आलेला नाही. त्यामुळे उपलब्ध बाजारात लसणाचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी संपूर्ण देशभरातच लसणाचे उत्पादन खालावले आहे. मे महिन्यापासूनच पावसाने जोर धरल्याने नवी लावण लांबली किंवा कमी झाली. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला. सांगलीच्या घाऊक बाजारपेठेत चांगल्या दर्जाचा लसूण ३०० रुपये किलो दराने मिळत आहे.

सामान्यत: जानेवारी ते मे दरम्यान नवीन लसणाचे उत्पादन होते. पण यंदा त्याचा साठा लवकरच संपला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातून येणारा लसूणही घटला आहे.

दिवाळीपर्यंत वाट पहा

नवा लसूण बाजारात येण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो, त्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता आहे. याच काळात महाराष्ट्रात सणांची धांदल सुरु असते. त्यामुळे मागणी तेजीत राहून दरदेखील कडक राहू शकतात.

मे महिन्यात लसूण १०० रुपये किलो दराने विकला. दर कमी होण्याच्या भीतीने सगळाच माल संपवला. आता दर वाढले, पण घरात लसूण शिल्लक नाही. - बाळासाहेब पाटील, उत्पादक शेतकरी, आरग.
 

लसणाचे दर आणखी वाढू शकतात. नवा माल बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांकडेसुद्धा शिल्लक नाही. सततच्या पावसाने हा परिणाम झाला आहे. - निसार देसाई, व्यावसायिक

Web Title: Garlic prices rise sharply Result of continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.