विट्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Published: July 12, 2015 12:41 AM2015-07-12T00:41:08+5:302015-07-12T00:41:08+5:30

तीन लाखांचे नुकसान : एकजण किरकोळ जखमी

Gas Cylinder Blast in Vitry | विट्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

विट्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

Next

विटा : येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारतीचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले, तर रणजितसिंह महेंद्र माने (वय १५) हा मुलगा किरकोळ जखमी झाला. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान विटा ते कऱ्हाड रस्त्यावरील शाहूनगर बसथांब्यासमोर घडली.
शाहूनगर बस थांब्यासमोर राजधन इमारतीत पहिल्या मजल्यावर महिंद्र राजाराम माने व रवींद्र राजाराम माने (मूळगाव नागेवाडी, सध्या रा. विटा, शाहूनगर) हे दोघे बंधू वास्तव्यास आहेत. त्यांनी बाहेर जिन्याच्या खुल्या जागेत भरलेला गॅस सिलेंडर ठेवला होता. शुक्रवारी ते झोपी गेल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, शेजारच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. भिंतींना तडे गेले. इमारतीत असलेल्या दोन फ्लॅटमधील आठ खिडक्या व सहा दरवाजे तुटून पडले. खिडक्यांच्या काचा पूर्णपणे फुटल्या. यावेळी घरात झोपलेल्या रणजितसिंह माने याच्या अंगावर खिडक्यांच्या काचा पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. परंतु, जिन्याच्या पॅसेजमध्ये आग असल्याने मजल्यावर अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढणे अडचणीचे ठरत होते. या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळताच पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमी रणजितसिंहसह घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. इमारतीचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
दैव बलवत्तर म्हणून...
सिलिंडरचा स्फोट झाला, त्यावेळी माने कुटुंबीय घरात झोपी गेले होते. स्फोटाच्या धक्क्याने दरवाजे तुटून पडलेच, शिवाय सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोट होताच घरातील विद्युतप्रवाह आपोआपच खंडित झाला. सिलिंडर जिन्यात बाहेरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Gas Cylinder Blast in Vitry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.