रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध
By अविनाश कोळी | Published: March 4, 2023 03:48 PM2023-03-04T15:48:53+5:302023-03-04T15:49:23+5:30
अच्छे दिन’ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला
सांगली: गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आज, शनिवारी सांगलीत राष्ट्रवादी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या थापल्या. शासनाच्या धोरणाचा निषेधही करण्यात आला.
सांगलीच्या वसंत कॉलनीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आघाडीच्या अध्यक्ष सुष्मिता जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जाधव म्हणाल्या की, गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका सामान्यांना न परवडणारा आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गॅस दरवाढ सातत्याने होत आहे. हजार रुपयांचा टप्पा ओलांडून गॅस दर पुढे गेला आहे. अनुदानही बंद केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा चूल मांडून स्वयंपाक करण्यास सरकार भाग पाडत आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
महिला आघाडीच्या नेत्या ज्योती अदाटे म्हणाल्या की, अच्छे दिन’ ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला आहे. गरिबांचे निम्मे बजेट सिलिंडरवर खर्च होणार असेल तर त्यांनी जगायचे कसे?
आंदोलनात वंदना चंदनशिवे, सुरेखा सातपुते, प्रियांका तुपलोंढे, छाया जाधव, संध्या आवळे, सुरेखा हेगडे, सुनीता जगदाळे, संगीता जाधव आदी महिला सहभागी झाल्या होत्या.