धुळगावमधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात
By admin | Published: January 8, 2015 11:12 PM2015-01-08T23:12:46+5:302015-01-09T00:11:18+5:30
वैद्यकीय पथकाकडून पाहणी : आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार
सोनी/तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथे दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची साथ आली असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, आज (गुरुवारी) दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आला नसून, सध्या साथ आटोक्यात आली आहे. सायंकाळपर्यंत आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार करण्यात आले. साथ नियंत्रणात आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.धुळगाव येथे दोन दिवसांपासून जुलाब, उलटी व तापाचा अचानक त्रास होऊ लागल्याने व ही सर्व लक्षणे गॅस्ट्रोची असल्याने वैद्यकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली होती. सांगली-मिरजेसारखी स्थिती येथे होऊ नये म्हणून मोठ्याप्रमाणात काम चालू केले होते.शंभरावर ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णांच्या घरीच उपचार सुरू होते. तातडीने उपचार झाल्याने लागण झालेल्या रुग्णांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होऊन साथ आटोक्यात आली आहे. नवीन रुग्ण आढळला नसला तरी, गावामध्ये सर्वांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी, प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे.
आज दुपारी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती गजानन कोठावळे, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली .
सरपंच जाफर मुजावर यांनी सांगितले की, गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे पाणी दूषित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी दूषित आल्याने साथ पसरली आहे. प्रादेशिकची जलवाहिनी बदलण्याची मागणी करणार आहे. (वार्ताहर)
मुख्य जलवाहिनीला गळती
२४ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी बंद होते. यादरम्यान विहिरीतून पाणी पुरवठा सुरु केला होता. दि. ४ पासून प्रादेशिक योजना पूर्ववत सुरू झाली. या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्यामुळे व पूर्वीचे शिल्लक पाणी बाहेर जाऊ न देता थेट लोकांपर्यंत गेल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा झाला.
गावात सध्या जिल्हास्तरीय वैद्यकीय पथकाने तळ ठोकला असून, गळती शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. आरोग्य विभागाच्या सहा कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गावात सर्वत्र पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे.