राष्ट्रवादीशी गट्टी, उपमहापौर गटाची सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 12:42 AM2016-04-17T00:42:07+5:302016-04-17T00:42:27+5:30
प्रभाग समिती सभापती निवड : बाळासाहेब काकडे, कांचन भंडारे, हसीना नायकवडी यांची बिनविरोध निवड
सांगली : महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत शनिवारी सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेऊन तीन सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध केल्या. उर्वरीत एक जागाही बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. उपमहापौर गटाला डच्चू देऊन पदाधिकाऱ्यांच्या गटाने राष्ट्रवादीला जवळ करण्याची केलेली खेळी महापालिकेत आता वेगळ््या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील एकूण चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी अंतिम मुदत होती. प्रभाग समिती क्र. १ च्या सभापतीपदी सत्ताधारी गटाचे बाळासाहेब काकडे, प्रभाग तीनच्या सभापतीपदी राष्ट्रवादी गटाच्या कांचन भंडारे आणि प्रभाग समिती ४ च्या सभापतिपदी काँग्रेसच्या हसीना इलियास नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग समिती क्र. २ च्या सभापतिपदासाठी काँग्रेसच्या मृणाल पाटील व राष्ट्रवादीचे युवराज गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्हीपैकी गायकवाड यांचा अर्ज मागे घेण्याची विनंती सत्ताधारी गटाने केली आहे. राष्ट्रवादीनेही त्यासाठी प्राथमिक तयारी दर्शविल्याने हीसुद्धा जागा बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
स्वाभिमानी आघाडी व राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका गटनेते किशोर जामदार यांनी मांडली आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. उपमहापौर विजय घाडगे गटाला डावलण्याचे राजकारण यामागे होते. राष्ट्रवादीच्यावतीने प्रभाग समिती क्र. ३ च्या सभापतिपदासाठी कांचन भंडारे यांचे नाव निश्चित केल्यानंतर स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी त्याला विरोध केला. भंडारे यांना उमेदवारी न देण्याचा आग्रह त्यांनी केला. किशोर जामदार यांनी त्यांची ही मागणी धुडकावली. प्रभाग समिती २ साठी स्वाभिमानी आघाडीने उमेदवार द्यावा, असे सूचविले. भंडारे यांच्या उमेदवारीनंतर स्वाभिमानी आघाडी नाराज झाली आणि त्यांनी निवड प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभाग समिती क्र. २ च्या पदासाठीही जामदार यांनी राष्ट्रवादीला आणखी एक अर्ज दाखल करण्यास सांगितले. उपमहापौर गटाला डावलण्यासाठीच पदाधिकाऱ्यांच्या गटाचे राजकारण अखेर यशस्वी झाले. (प्रतिनिधी)