गुंडाचा गुडमॉर्निंग पथकावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 09:22 PM2017-07-29T21:22:58+5:302017-07-29T21:22:58+5:30
महापालिका कर्मचा-यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पांडुरंग मोरे या गुंडाने दगडफेक करीत पलायन केले
मिरज, दि. 29 - मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर महापालिकेच्या गुडमॉर्निंग पथकावर तडीपार गुंडाने तलवार हल्लयाचा प्रयत्न केला. महापालिका कर्मचा-यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पांडुरंग मोरे या गुंडाने दगडफेक करीत पलायन केले. प्रकारामुळे महापालिका प्रशासनाने गुडमॉर्निंग पथकासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
उघड्यावर शौचास जाणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका कर्मचा-यांची गुडमॉर्निंग पथके शहरातील विविध झोपडपट्ट्यांच्या परिसरात सकाळच्यावेळी गस्त घालीत आहेत. उघड्यावर शौचाला जाणा-यांना प्रतिबंध करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेगेटलगत असलेल्या झोपडपट्टीजवळ गुडमॉर्निंग पथक गेल्यानंतर पांडुरंग मोरे हा उघड्यावर शौचाला जाताना दिसल्याने त्यास हटकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या मोरे याने घरातून तलवार आणून गुडमॉर्निंग पथकावर हल्लयाचा प्रयत्न केल्याने कर्मचा-यांनी पलायन केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर पांडुरंग मोरे याने त्यांच्यावर दगडफेक करीत पलायन केले. पांडुरंग मोरे हा भिलवडी परिसरातील तडीपार गुंड असून, त्याच्यावर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. महापालिकेचे गुडमॉर्निंग पथक महिनाभर दररोज सकाळी कृष्णाघाट रस्त्यावरील झोपडपट्टीत जाऊन उघड्यावर शौचाला प्रतिबंध करीत असल्याने मोरे याने आज तलवार हल्लयाचा प्रयत्न करून पथकाला पिटाळून लावले. गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाईमुळे दररोज अनेक ठिकाणी वादावादी, दमदाटीचे प्रकार घडत असून, तलवार हल्ल्याच्या प्रयत्नामुळे गुडमॉर्निंग पथकासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.