सांगलीत गव्यांचा ठाण, शिराळा परिसरात चार गव्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 01:46 PM2022-01-04T13:46:33+5:302022-01-04T14:13:50+5:30
बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिराळा : शिराळा शहरा नजीक असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी दरम्यान आज सकाळच्या सुमारास चार गव्यांचा वावर आढळून आला. याच परिसरात बिबट्याचाही वावर आहे. काही महिन्यांपूर्वी दुचाकीवरील नागरिकावर बिबट्याने हल्ला केला होता.
दरम्यान बिऊर , भाटशिरगाव , पावलेवाडी आदी परिसरातही ८ गव्यांचा कळप आढळून आला. मानवी वस्तीत वाढत असलेल्या बिबट्या व गव्यांच्या वावरामुळे नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे बाहेर कोरोना अन् शेतात गव्याची भीती अशी अवस्था झाल्याने शेतांच्या कामात व्यत्यय येत आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांना खाद्य मिळत नसलेने त्यांचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे. बिबटे, माकडं, वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झालेला असतो. माकडं व वानरे पिकांचे नुकसान करीत आहेत.
काही महिन्यांपूर्वी मणदूर येथील संतू पाटील यांना गव्याने जखमी केले होते. देववाडी, खेड फाटा, शिराळा बस स्थानक, चिखलवाडी, पवारवाडी, शिंगटेवाडी आदी परिसरात दि.२९ व ३० एप्रिल २०२० रोजी रात्री गव्याचे दर्शन झाले होते. हा गव्याने डांगे गल्ली, पवळ गल्लीतून गेला व याठिकाणी मक्याच्या पिकाचे नुकसान केले होते.
वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तसीलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परीसराची पाहणी केली.