आरगमध्ये करणीची भीती दाखविणाऱ्या गौराबाईचा भांडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:49+5:302021-03-21T04:25:49+5:30
सांगली : ‘सासूच्या करणीने तुम्हाला त्रास होत आहे, तो टाळण्यासाठी जादूटोण्याचे उपचार करावे लागतील, अन्यथा वाईट परिणाम होतील’, ...
सांगली : ‘सासूच्या करणीने तुम्हाला त्रास होत आहे, तो टाळण्यासाठी जादूटोण्याचे उपचार करावे लागतील, अन्यथा वाईट परिणाम होतील’, अशी भीती घालणाऱ्या आरग (ता. मिरज) येथील गैाराबाई नाईक या मांत्रिक महिलेचा भांडाफोड करण्यात आला.
गावातील प्रतिष्ठित कुटुंबात करणीच्या भीतीने कलह माजविल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गौराबाईविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार तिच्याविरोधात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरगमध्ये पोरे मळ्यात राहणाऱ्या गौराबाईविरोधात या कुटुंबातील विवाहितेने सांगली अंनिसकडे तक्रार दाखल केली होती. सासूने करणी केल्याची भीती दाखवत गौराबाई या विवाहितेकडून वेळोवेळी पैसे व महागड्या वस्तू वसूल करत होती. करणी काढण्यासाठी विवाहितेला विशाळगड, सौंदत्ती येथे फिरविले. दैवी उपचारांचा बहाणा केला. तिच्या सासरच्या घरातून करणीच्या वस्तू काढण्याचे ढोंगही केले.
गौराबाईच्या सल्ल्यानुसार विवाहिता वागत असल्याने कुटुंबात कलह निर्माण झाला. तिचे पतीबरोबर वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे सासरच्या घरातून मुलीसह बाहेर पडण्याची वेळ आली. गैाराबाईकडून घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याशी संपर्क केला. तिच्याविरोधात लेखी तक्रार दिली. ती लोकांची फसवणूक करत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. विवाहितेमार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गौराबाईच्या दरबारावर धाड टाकून तिला ताब्यात घेतले.
चौकट
सवतीच्या करणीने अघोरी त्रास
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गौराबाईच्या बुवाबाजीच्या खातरजमेसाठी बनावट ‘ग्राहक’ पाठविले. प. रा. आर्डे, आशा धनाले व त्रिशला शहा तिच्या दरबारात डमी भक्त म्हणून गेले. धनाले यांना अघोरी त्रास होत असल्याचा बनाव केला. त्यावेळी गौराबाईच्या अंगात म्हाकुबाईचे वारे संचारले. धनाले यांच्यावर सवतीने करणी केल्याने त्रास होत असल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी दर रविवारी दरबारात हजेरी लावायला सांगितले. उतारा म्हणून भंडारा, गळ्यात बांधण्यासाठी मंत्रून गोमूत्रात बुडवलेला काळा दोरा दिला. अंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी बाटली भरून गोमूत्र दिले.