इनरव्हील क्लबतर्फे सांगलीत गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:10+5:302021-03-19T04:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनरव्हिल क्लब ऑफ सांगलीच्यावतीने तेजस्वीनी पुरस्कार वितरण कार्यक्रम सांगलीत पार पडला. यावेळी समाजातील कर्तृत्ववान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इनरव्हिल क्लब ऑफ सांगलीच्यावतीने तेजस्वीनी पुरस्कार वितरण कार्यक्रम सांगलीत पार पडला. यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांसह इनरव्हीलचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच मार्गारेट गोल्डी अवॉर्ड विजेत्या सौ. स्मिता शिरगावकर यांचा गौरव करण्यात आला.
क्लबच्या माजी अध्यक्ष प्रभाताई कुलकर्णी यांच्याहस्ते स्मिता शिरगावकर यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मानपत्र, सूर्यफूल, पुष्पहार, साडी, ओटी यांचा समावेश होता. स्मिता शिरगावकर यांच्या कार्याची ओळख नीता केळकर यांनी करून दिली. केळकर म्हणाल्या की, शालेय जीवनापासून शिरगावकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बहरत गेले. गेली ५५ वर्षे स्मिताताई व प्रभाताई क्लबचा भक्कम आधारस्तंभ आहेत. मानपत्रलेखन व वाचन चेतना वैद्य यांनी केले.
गेली अनेक वर्षे तेजस्विनी पुरस्कार देण्याची क्लबची परंपरा आहे. समाजातील तळागाळातल्या महिला स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन कुटुंबाला मोठे करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याची दखल घेऊन तीन महिलांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. मिरजेतील केळीविक्रेत्या जगदेवी माशाळकर, विविध प्रकारचे खाकरे बनवणाऱ्या वनिता शहा व सिव्हिल रुग्णालयातील आरोग्यसेविका सोनाली यांना तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रशासनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल जीएसटीच्या सहायक आयुक्त शर्मिला मिस्कीन यांना 'उत्तम प्रशासक' म्हणून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. नंदा झाडबुके यांनी केले. अध्यक्षा स्मिता दोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीपाली देशमुख व डॉक्टर उज्वला गवळी यांनी केले. श्यामा शहा यांनी आभार मानले.