सांगलीची रत्ने : अविनाश सप्रे, अन् ‘समीक्षक’ म्हणून महाराष्ट्रभर ओळख प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 04:07 PM2024-01-08T16:07:01+5:302024-01-08T16:07:45+5:30

नाशिकला कुसुमाग्रज गौरव व्याख्यानमालेत 'स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी' या' विषयावर दोन व्याख्याने दिली. ( स्वत: कुसुमाग्रज त्यावेळी श्रोत्यात हजर होते.) ...

Gems of Sangli: Avinash Sapre, and recognized throughout Maharashtra as a 'Critic' | सांगलीची रत्ने : अविनाश सप्रे, अन् ‘समीक्षक’ म्हणून महाराष्ट्रभर ओळख प्राप्त

सांगलीची रत्ने : अविनाश सप्रे, अन् ‘समीक्षक’ म्हणून महाराष्ट्रभर ओळख प्राप्त

नाशिकला कुसुमाग्रज गौरव व्याख्यानमालेत 'स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी' या' विषयावर दोन व्याख्याने दिली. ( स्वत: कुसुमाग्रज त्यावेळी श्रोत्यात हजर होते.) ही व्याख्याने लेखस्वरूपात लिहिली आणि ‘प्रदक्षिणा : खंड दोन’मधून प्रकाशित झाली. या जवळजवळ नव्वदपानी दीर्घलेखातून मी स्वातंत्र्योत्तर काळातील कादंबऱ्यामधल्या प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाहांचा चिकित्सक वेध घेतला होता. या लेखामुळे ‘समीक्षक’ म्हणून माझी महाराष्ट्रभर ओळख प्राप्त झाली. सांगलीच्या इथल्या वास्तव्यातच हा सर्व लेखन प्रपंच करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

मी तसा मूळचा कोल्हापूरचा. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे या निसर्गसंपन्न आणि संस्कृती समृद्ध गावात लहानाचा मोठा झालो. पुढे कोल्हापूरला इंग्रजी हा विषय घेऊन राजाराम कॉलेजमधून बी.ए. आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. केले. १९७४ साली सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये रूजू झालो आणि २००७ साली इथल्याच चिंतामणराव कॉलेजमधून निवृत्त झालो. विलिंग्डनमध्ये प्रा. म. द. हातकणंगलेकर सर प्राचार्य होते. त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदरयुक्त दरारा वाटत असे. त्यांच्या हाताखाली काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची समीक्षा मी काळजीपूर्वक वाचत होतो, समीक्षा कशी करावी, याचा वस्तुपाठच मला त्यातून मिळत होता. त्यातून ‘अभ्यासोनी प्रकटावे' ही वृत्तीच बनली. विलिंग्डनच्या ग्रंथालयात सातत्याने येत असलेली नवनवीन पुस्तके आणि मासिके, ग्रंथपाल रास्ते आवर्जून वाचायला देत असत. त्यातून मग आपणही लिहायला हवे असे वाटू लागले. 

सरांनी विलिंग्डनमध्ये ‘मराठी भाषा : शैली आणि तंत्र’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. अनेक नामवंत अभ्यासक, समीक्षक त्यात सहभागी झाले होते. त्या संबंधीचा मी लेख लिहिला, तो ‘सत्यकथा’मध्ये प्रकाशित झाला. भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीने भारावून गेलो होतो. या कादंबरीवर लेख लिहिला. (‘कोसला’बद्दल या पुस्तकात तो समाविष्ट केला आहे.) इचलकरंजीला झालेल्या नाट्यसंमेलनाच्या वेळी नव्या प्रकारच्या असंगत नाट्यलेखनामुळे लक्षवेधी ठरलेल्या नवनाटककार सतीश आळेकर यांच्या नाट्यलेखनावर लिहिलेला दीर्घलेख संमेलनाच्या संग्राह्य स्मरणिकेत प्रसिद्ध झाला.

महाराष्ट्र व इतर राज्यांतील विद्यापीठांनी भाषा, साहित्य, संस्कृतीसंबंधी आयोजित केलेल्या चर्चासत्रासाठी, परिसंवादासाठी, व्याख्यानासाठी आमंत्रित केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेचा आजीव सदस्य म्हणून कार्यरत राहिलो. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार, जनस्थान, कुसुमाग्रज पुरस्कार (नाशिक), शासन पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (दिल्ली), प्रतिष्ठित पुरस्कारांच्या निवड समितीवर काम केले. सांगलीतल्या 'चतुरंग-अन्वय'या दिवाळी अंकाचा कार्यकारी संपादक म्हणूनही सध्या कार्यरत आहे.

बंगळुरूला अनंतमूर्तींची मुलाखत..

महाराष्ट्र राज्याच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र लेखन' या प्रकल्पाच्या पहिल्या पंचवीस खंडांपैकी महाराजांच्या इंग्रजी भाषणांचा समावेश असलेल्या खंड सहा आणि सातचे संपादन आणि प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली. 'लोकमत'च्या वतीनं प्रसिद्ध होणाऱ्या 'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी प्रत्यक्ष बंगळुरुला जाऊन विख्यात कानडी लेखक आणि साहित्य अकादमीचे तेव्हा अध्यक्ष असलेल्या यु. आर. अनंतमूर्ती यांची मुलाखत घेतली.

Web Title: Gems of Sangli: Avinash Sapre, and recognized throughout Maharashtra as a 'Critic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली