अवघ्या वीस मिनिटांत सायकलद्वारे वीज निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:27+5:302021-06-06T04:20:27+5:30
युनूस शेख लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील महादेवनगरातील प्रगतशील शेतकरी महिपती शिंदे-पाटील यांनी जुनी सायकल, जुनी बॅटरी, बेल्ट ...
युनूस शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील महादेवनगरातील प्रगतशील शेतकरी महिपती शिंदे-पाटील यांनी जुनी सायकल, जुनी बॅटरी, बेल्ट आणि अल्टरनेटरचा वापर करून अवघ्या वीस मिनिटांच्या सायकलिंगद्वारे संपूर्ण घराला २४ तास पुरेल एवढी वीजनिर्मिती करण्याचा फंडा यशस्वी करून दाखवला आहे. गेल्या वर्षभरापासून ते या विजेचा वापर करत आहेत.
महिपती शिंदे-पाटील, वय वर्षे ५०, शिक्षण अवघे दहावीपर्यंत. मात्र बुद्धी तल्लख. शेतीत जसा नावीन्याचा शोध घेतात, तसेच दैनंदिन जगण्यातही वेगळेपण जपतात. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात खंडित होणाऱ्या विजेने त्रस्त करून सोडले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात सायकलद्वारे वीज निर्मितीचा विचार आला. त्यांच्याकडे लहान मुलीची जुनी सायकल होती. मोटारीची १२ व्होल्टची जुनी बॅटरी होती. मग अल्टरनेटर आणि एक बेल्ट मिळवला. एवढ्या साधनांवर त्यांनी आठ दिवसांत वीज निर्मिती करणाऱ्या सायकलची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.
सायकलचे पुढील चाक काढून तेथे बॅटरी बसवली आहे, तर मागील चाकाच्या फक्त रिमचा वापर केला आहे. मागील कॅरेजवर अल्टरनेटर बसवून तो बेल्टद्वारे रिमला जोडून चेनव्हीलच्या सहाय्याने पायडल मारल्यावर बॅटरी चार्ज करणाऱ्या वीज निर्मितीला सुरुवात होते. चार्जिंगला सुरुवात झाल्याचे समजण्यासाठी पुढे हँडलवर दिवा बसवला आहे. सुरुवातीला पायडल जास्त दाब देऊन चालवावे लागते. वीस मिनिटांत १२ व्होल्टची बॅटरी चार्ज होते.
पाटील यांनी ही वीज घरातील चार खोल्यांमध्ये थेट पुरवठा पद्धतीने जोडली आहे. त्यावर चार दिवे लागतात. या दिव्यांचा शुभ्रधवल उजेड मिळतो. शिवाय वीज नसताना या बॅटरीवर एक कूलर आणि छोटा पंखाही ते वापरतात. या प्रयोगातून कुटुंबातील प्रत्येकाचा सायकल चालविण्याचा व्यायामही होत आहे.
हाडाचा शेतकरी
महिपती पाटील हाडाचे शेतकरी आहेत. वीस एकरांतून एकरी १०० टनांप्रमाणे दोन हजार टन उसाचे उत्पादन ते घेतात. गुजरातच्या गणदेवी कारखान्याच्या अध्यक्ष आणि संचालकांनी या ऊसशेतीला भेट देऊन प्रशंसा केली आहे.
लक्ष्मीच्या पावलांची अर्धांगिनी
पाटील यांनी स्वतःचा फ्लॅट, चारचाकी, चार दुचाकी, ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर अशी कष्टाची दौलत कमावली आहे. त्यांच्या या प्रवासात पत्नी जयश्री यांची साथ मिळाली आहे. त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. १८-१८ तास अभ्यास करताना सहा-सहा महिने घराचा उंबरा न ओलांडणाऱ्या आणि नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या जयश्री यांच्याविषयी पाटील यांना कमालीचा आदरभाव आहे. सकाळचे जेवण आणि शेतातील डबा, घरातील सर्व कामे उरकून त्या अध्यापनासाठी सकाळी साडेसातला बाहेर पडतात.