सांगलीच्या मातीतलं अस्सल सोनं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:24+5:302021-03-28T04:24:24+5:30
सांगलीच्या मातीतून पिकणारे अस्सल सोने म्हणून येथील राजापुरी हळदीची ओळख जगभरात होते. सर्वप्रकारच्या हळदीत सर्वाधिक भरपूर औषधी गुणधर्म सांगलीच्या ...
सांगलीच्या मातीतून पिकणारे अस्सल सोने म्हणून येथील राजापुरी हळदीची ओळख जगभरात होते. सर्वप्रकारच्या हळदीत सर्वाधिक भरपूर औषधी गुणधर्म सांगलीच्या हळदीला मिळाले. म्हणूनच जागतिक बाजारात तब्बल सव्वाशे वर्षांपासून या हळदीचे राज्य सुरू आहे.
मनाला मोहित करणारा सुगंध, केशरचा रंग, जिभेला भावणारी चव अशा अनेक वैशिष्ट्यांनी सांगलीच्या हळदीला साज चढविला आहे. म्हणून जागतिक स्तरावर या हळदीला भारतीय केसर (इंडियन सॅफ्रन) असे संबोधले जाते.
सांगलीची हळद म्हणून तिला जी. आय. (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे. त्यामुळे सांगलीची ही खासीयत म्हणून सिद्ध झाली आहे. सांगलीची हळद असताना तिला राजापुरी नाव कसे पडले, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागेही रंजक कहाणी आहे. सांगलीच्या बाजारातून ही हळद रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बंदरात जाऊन तिथून तो माल विदेशात जायचा. त्यामुळे राजापुरी हळद असे त्यास नाव पडले. राजापूर आणि हळदीचा काही संबंध नाही. केवळ बंदरामुळे हळदीस ते नाव मिळाले.
सांगलीच्या हळद व्यापाराने २०२१ मध्ये १११ वर्षे पूर्ण केली आहेत. येथील काही व्यापार्यांनी एकत्र येऊन १९१० मध्ये हळदीचा वायदे बाजार सुरू केला. त्यावेळी व्यापारी एकमेकांच्या शब्दावर विश्वास ठेवून वायदे व्यवहार करत. व्यवहारांचे नियंत्रण करणारी संस्था किंवा पैशांच्या देव-घेवीसाठी क्लिअरिंग हाऊसची सोय त्यावेळी नव्हती. कायद्याचेही नियंत्रण नव्हते. स्वातंत्र्यानंतर फॉर्वर्ड कॉण्टॅक्टस (रेग्युलेशन) ॲक्ट १९५२ मध्ये अमलात आला. त्यापासून प्रेरणा घेऊन सांगलीच्या व्यापारी मंडळींनी वायदे व्यवहाराचे आयोजन व नियंत्रण करण्यासाठी 'द स्पायसेस अँड ऑईल सीडस एक्स्चेंज लि.' या कंपनीची स्थापना केली होती. येथे अजूनही हळदीवर प्रक्रिया करणारे ५० हून अधिक कारखाने आहेत.