नवनाथ साळुंखेंच्या पत्नीला शासकीय नोकरीत घ्या, नाभिक महामंडळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 03:28 AM2020-06-21T03:28:53+5:302020-06-21T03:28:59+5:30
तसेच राज्यातील सलून दुकाने सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सांगली : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील नवनाथ साळुंखे यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे सारे कुटुंबच रस्त्यावर आले आहे. शासनाने याची त्वरित दखल घेऊन त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी नाभिक महामंडळाने केली आहे. तसेच राज्यातील सलून दुकाने सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
साळुंखे यांनी व्यवसायाअभावी झालेल्या आर्थिक कोंडीला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. नाभिक महामंडळाने मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. राज्य संघटक शशिकांत गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. व्यावसायिकांची उपासमार व आत्महत्या टाळण्यासाठी सर्व सलून दुकाने कोरोनाविषयक अटींचे पालन करत उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा प्रतिमहिना १५ हजार रुपयांची मदत प्रत्येक सलून व्यावसायिकाला द्यावी.