केंद्र सरकारकडून आता किमान २७-२८ रुपयांना पेट्रोल मिळाव
By admin | Published: January 23, 2015 12:32 AM2015-01-23T00:32:20+5:302015-01-23T00:36:10+5:30
जयंत पाटील : सर्वसामान्यांना स्वस्ताईचे नुसते स्वप्न दाखवू नको
गोटखिंडी : काँग्रेस सरकारच्या काळात जागतिक बाजारपेठेत १२० डॉलरला मिळणारा पेट्रोलचा बॅरेल आता ४३ डॉलरला मिळत आहे़ पूर्वी आपल्या देशात ८२ रुपयांना एक लिटर पेट्रोल मिळायचे़ आता ते ५६ रुपयांना मिळते़ मात्र ते २७ ते २८ रुपयांनाच मिळायला हवे़ सामान्य माणसांना ‘स्वस्ताईची स्वप्ने’ दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने हे करायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथे आभार दौऱ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत आ़ पाटील बोलत होते़ राष्ट्र्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जि़ प़ सदस्य रणजित पाटील, पंचायत समिती सदस्या सौ़ रेखा कोळेकर, कारखान्याच्या इरिगेशन समितीचे अध्यक्ष ए़ टी़ पाटील प्रामुख्याने उपस्थित होते़
आ़ पाटील म्हणाले, भाजपचे खासदार हिंदूंनी चार-चार मुलांना जन्म घालावा, असे सांगतात़ त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत़ हिंदंूची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता वाढवायला हवी़ मोदींनी देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे़ आमचे राज्यात सरकार आले तर, एलबीटी, टोलनाके बंद करू म्हणणाऱ्यांना अजून ते जमलेले नाही़ मोदी सरकार ग्रामीण भागापेक्षा शहरातील नागरिकांची काळजी अधिक करताना दिसते.
बी. के. पाटील, रणजित पाटील, सौ़ रेखा कोळेकर, संजय पाटील, धैर्यशील थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. इरिगेशन समितीचे अध्यक्ष ए़ टी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़, तर विजय लोंढे यांनी आभार मानले़ याप्रसंगी सरपंच रेहाना जमादार, उपसरपंच विजय पाटील, बँकेचे माजी संचालक एन. जी. पाटील, कारखान्याचे माजी संचालक शंकरराव पाटील, सागर डवंग, प्रकाश पाटील, शंकरराव पाटील, सुभाष शिंगटे, प्रकाश एटम, प्रदीप थोरात, भुजंग थोरात, मधूकर पाटील, रमेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)