शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:33 AM2023-11-30T11:33:02+5:302023-11-30T12:18:04+5:30

सांगलीत सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका, पोलिसांनाही दिले आव्हान 

Get ready to topple the government that is robbing the farmers, Prakash Ambedkar appeal | शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

सांगली : अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकऱ्यांचेही नुकसान करायचे, असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडताहेत. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.

सांगलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी पक्षाचे नेते जयसिंग शेंडगे, सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांती सावंत, इम्तियाज सादिक, दिशा पिंकी शेख आदी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या लोकांच्या नकळत पैसे लुटले जात आहेत. शेतीमालाच्या माध्यमातून लुटीचा नवा फंडा या सरकारने शोधून निवडणूक फंड म्हणून त्याचा वापर सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी टॉमेटोचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यांनी ते कवडीमोल दरात विकून टाकले. त्यानंतर दीडच महिन्यात प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत हे दर वाढले. त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा दर पाडण्यात आले. भाववाढीच्या काळात ३५ हजार कोटींची लूट या देशात झाली. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला. यावर प्रतिवाद करायचा असेल तर मी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.

ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांचा सत्ताकाळ लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर लुटण्यासाठी कारणी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्यांना कशाचेही भान नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा कशी आहे, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.

मोदींच्या काळात १४ लाख हिंदू कुटुंबांचे स्थलांतर

आंबेडकर म्हणाले की, भारतात १९५० ते २०१४ या ६४ वर्षांच्या काळात ७ हजार ६४४ भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. स्वत:ला हिंदू रक्षणकर्ते समजणाऱ्या मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या कालावधीत १४ लाख भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. ईडीची भीती दाखवून आपली संपत्ती व इभ्रत लुटली जाईल, याची भीती या कुटुंबांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर केले.

सभा बरसला पाऊस

प्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. तुरळक पावसात भिजतच ते बोलत होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. सभा संपल्यानंतर अल्पावधीतच क्रीडांगणावर मुसळधार पावसामुळे दलदल निर्माण झाली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करावाच

व्यासपीठावर अनेक महापुरुषांच्या प्रतिमांसह आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिंमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Web Title: Get ready to topple the government that is robbing the farmers, Prakash Ambedkar appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.