जतजवळच्या अडीच कोटींच्या लुटीचा १८ तासांत छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:14+5:302021-01-17T04:23:14+5:30
सांगली : डोळ्यांत चटणी टाकून सराफाकडील दोन कोटी २६ लाख ५ हजारांचे ४ किलो ५३० ग्रॅम सोने आणि ...
सांगली : डोळ्यांत चटणी टाकून सराफाकडील दोन कोटी २६ लाख ५ हजारांचे ४ किलो ५३० ग्रॅम सोने आणि मोबाईल लुटणाऱ्या पाचजणांच्या टोळीस पोलिसांनी अवघ्या १८ तासांत जेरबंद केले. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास जतजवळ हा प्रकार घडला होता. सराफाच्या कामगारानेच सहकाऱ्यांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रकरणी प्रवीण उत्तम चव्हाण (वय २७), विजय बाळासाहेब नांगरे (२७, दोघेही रा. य.पा.वाडी, ता. आटपाडी), विशाल बाळू कारंडे (२७, रा. गोरेगाव, ता. खटाव, जि. सातारा), तात्यासाहेब शेट्टीबा गुसाले (३६, रा. मरडवाघ, ता. खटाव, जि. सातारा) आणि वैभव साहेबराव माने (३२, रा. भोसरे, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज-पंढरपूर मार्गावर देशिंग फाटा येथे संशयितांना मुद्देमालासह अटक केली.
पळसखेड (ता. आटपाडी) येथील बाळासाहेब वसंत सावंत यांचे शहापूर (बेळगाव) येथे सराफी दुकान आहे. कामगार प्रवीण चव्हाण याच्यासह ते गुरुवारी रात्री शेगाव येथील सराफ संजय नलावडे यांना साडेचार किलो सोने देण्यासाठी जत मार्गे येत होते. शेगावजवळ आल्यानंतर ते लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी पाठीमागून व्हॅनमधून आलेल्या चौघा संशयितांनी रिव्हाॅल्वरचा धाक दाखवून दोघांच्या डोळ्यांत चटणी टाकून सोने घेऊन पोबारा केला होता. सावंत यांच्यासोबत असलेला चव्हाणच अन्य साथीदारांना सर्व माहिती देत होता व त्यानेच लुटीचा डाव आखला होता.
अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.