पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घ्या - वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:51 PM2023-12-25T18:51:24+5:302023-12-25T18:51:35+5:30
सांगलीत महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन
सांगली : बदललेली नैसर्गिक रचना आणि पशू, पक्ष्यांच्या अधिवासातही वारंवार बदल होत असल्याने वन्यजीव अभ्यासकांना आव्हान निर्माण होत आहे. वृक्षतोड वाढल्याने निसर्गाची साखळीही तुटत आहे. त्यामुळे परदेशात पन्नास - साठ वर्षांपासूनच निसर्ग संवधर्नाची हाक दिली जात आहे. आपल्यात अद्याप त्यावर तितकी कार्यवाही होत नाही. तरीही वन्यजीव अभ्यासकांनी नाउमेद न होता पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घेण्यासाठी निसर्गाशी एकरूप झाल्यास काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी रविवारी सांगलीत केले. सांगलीत झालेल्या ३६व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनात ‘पिसे आणि पसारा’ या विषयावर ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, आपल्याला नेहमीच परदेशी लोकांचे आणि त्यांच्या वन्यजीव अभ्यासाचे आकर्षण असते. मात्र, आपल्या देशातील निसर्गसंपदाही समृध्द असल्याने त्याचा अभ्यासासाठी उपयोग व्हायला हवा. त्यामुळे पक्ष्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गात जाऊन त्याचा अभ्यास करायला हवा.
पक्षीनिरीक्षणातील फोटोग्राफी हा महत्त्वाचा भाग असतो. गेला आणि फोटा काढला, असे कधीच होत नाही. त्यासाठी सर्वांत पहिल्यांदा त्या पक्ष्यासोबत आपली ओळख होणे आवश्यक असते. यासह निसर्गातील प्रत्येक घटक जेव्हा आपला सरावाचा होतो तेव्हाच चांगले फोटो घेता येऊ शकतात. अनेकदा एका चांगल्या निसर्ग फोटोसाठी दोन दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. सध्या मात्र, पक्षी आणि वनांचे भावविश्व जाणूनही घेण्याची तसदी नसलेले यासाठी पुढे येतात आणि त्यांची निराशा होते.
आपण निसर्गाचे देणे लागतो, त्यामुळे या निसर्गातील ते क्षण टिपण्यासाठी तेवढाच संयम आपल्यातही असायला हवा, असेही पाटील म्हणाले.
पाटील यांच्या फोटोग्राफी टीप्स
- निसर्ग फोटो शक्यतो सकाळी ६:०० ते ७:०० आणि सायंकाळी ६:०० पर्यंत करा.
- ट्रायपॉडचा वापर आवश्य करा.
- पक्ष्यांच्या फोटोसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी आहे.
- नैसर्गिक रंगसंपदेचा अभ्यास करूनच अँगल निवडा.
- पक्ष्यांची कृती आणि वर्तन यातील फोटो अधिक प्रभावी असतात.