वारणाली हाॅस्पिटलचे काम जलद पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:02+5:302021-06-24T04:19:02+5:30
फोटो ओळ - वारणाली येथे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या कामाची आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक विष्णू माने, नगररचनाकार ...
फोटो ओळ - वारणाली येथे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या कामाची आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक विष्णू माने, नगररचनाकार आर.व्ही. काकडे, शाखा अभियंता आलताफ मकानदार, अशोक कुंभार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहर परिसरासह उपनगरातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या हाॅस्पिटलचे काम जलदगतीने सुरू करून पूर्ण करा, असे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून संबंधित ठेकेदाराला देण्यात आले.
वारणाली येथे महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामास सुरुवात झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस व नगरसेवक विष्णू माने यांनी बुधवारी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वारणालीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेविरोधातील दाखल झालेल्या दोन्हीही याचिका न्यायालयाने फेटाळल्याने हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे हॉस्पिटल उभारणीच्या कामास गतीने सुरुवात झाली आहे.
या जागेवर सध्या लाइटच्या व्यवस्थेसह मुरुमीकरण करून शेड उभारले आहे. भूमिपूजन पुढील आठवड्यात होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितले.
हॉस्पिटल उभारणीसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या बांधकामाचे टेंडर ५ कोटींचे असून ५० बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी नगररचनाकार आर.व्ही. काकडे, शाखा अभियंता आलताफ मकानदार, अशोक कुंभार उपस्थित होते.