Sangli: घोगाव योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा ठणठणाट
By अशोक डोंबाळे | Published: April 4, 2024 07:06 PM2024-04-04T19:06:19+5:302024-04-04T19:06:32+5:30
विटा शहरात पाणीटंचाई : दोन दिवसांपासून योजना बंदच
विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या घोगाव नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी बलवडी (भा.) येथे फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत शहरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
दरम्यान, अनेक मालमत्ताधारकांना खासगी पाण्याचे टॅँकर मागवावे लागत असल्याने टॅँकर चालक खुश झाले आहेत. पलूस तालुक्यातील घोगाव येथील कृष्णा नदीपात्रातून विटा शहराला नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. नगरपालिका नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत असली तरी ते पाणी पूर्ण दाबाने मिळत नाहीच, शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही बिघडले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मात्र या योजनेची बलवडी (भा.) येथील पवार मळ्याजवळ मंगळवारी रात्री मुख्य जलवाहिनीच फुटली आहे. परिणामी, लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी रात्रीपासून विटा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी विटा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून बलवडी येथे काम करीत आहेत. परंतु, त्यात त्यांना अद्यापही फारसे यश आलेले नाही. त्यामुळे अजून किती दिवस पाणीपुरवठा बंद राहणार? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
योग्य नियोजनाची गरज..
विटा नगर परिषदेने घरगुती एका नळ कनेक्शनला वार्षिक तीन हजार ५०० रुपये पाणीपट्टी आकारली आहे. त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वर्षाची पाणीपट्टी भरून नागरिकांना सहा महिनेच पाणी दिले जात आहे. त्यात आणखी असा बिघाड होऊन पाणी न मिळण्याच्या दिवसात वाढ होत आहे. एक दिवसाआड पाणी दिले तरी पुरेसे व उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी देण्याच्या व्यवस्थेत बदल करून त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.