घोरपडेंची संजयकाकांवर कुरघोडी
By admin | Published: April 28, 2017 01:00 AM2017-04-28T01:00:03+5:302017-04-28T01:00:03+5:30
घोरपडेंची संजयकाकांवर कुरघोडी
अर्जुन कर्पे ल्ल कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीवरून खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला असून, एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. एकीकडे सत्तेच्या राजकारणात घोरपडेंनी बाजी मारली आहे, तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांना मतांची चांगली गोळाबेरीज करूनही पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फटका बसला आहे.
काही महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचे समर्थक दादासाहेब कोळेकर यांना सांगली बाजार समितीवर स्वीकृत संचालक करून, कवठेमहांकाळ बाजार समितीचे सभापती केले. बाजार समितीच्या निवडणुकीत पतंगराव कदम यांनी घोरपडेंची साथ घेऊन सत्ता आणली, परंतु सभापती निवडीत कदम यांनी घोरपडे यांना खड्यासारखे बाजूला केले आणि खासदार संजयकाकांना बरोबर घेत निवड केली. घोरपडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का होता.
राजकारणात धुरंधर असणाऱ्या घोरपडेंनीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत घरोबा करून कवठेमहांकाळसह तासगाव तालुक्यातही संजयकाका पाटील यांना शह दिला.
कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये संजयकाकांना पंचायत समितीच्या केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही घोरपडे यांनी जिल्ह्यातील काका गटाचे विरोधक एकत्र करीत शह दिला. त्यामुळेच डी. के. पाटील यांच्यासारखा प्रबळ दावेदार असूनही काका गटाला अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले.
एवढ्यावरच घोरपडे थांबले नाहीत. आता बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले यांच्या माध्यमातून बाजार समितीतूनही काका गटाला शह देण्याची तयारी चालविली आहे. डुबुले यांनी कवठेमहांकाळ बाजार समिती आवाराचे सभापती दादासाहेब कोळेकर यांची निवड कायद्याला धरून नाही, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करीत कोळेकर यांचे सभापतीपद रद्द केले. घोरपडेंची ही चाल काका गटाच्या जिव्हारी लागली. यानंतर काकांनीही राजकीय ताकद लावून घोरपडेंचा हा डाव उधळून लावला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून कोळेकर यांचे सभापतीपद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविली.
अजितरावांनी दुहेरी राजकीय चाल खेळत बेरजेचे राजकारण केले. जि. प., पं. स. निवडणुकीत स्वाभिमानी आघाडी आणि राष्ट्रवादीशी युती करून काका गटाला रोखले. कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सत्तेत वाटा मिळविला. उपसभापतीपदही पदरात पाडून घेतले. सध्या जरी सत्तेत पद मिळाले नसले तरी, येत्या दोन वर्षात घोरपडे गटाला सभापतीपदाची संधी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे.
खा. पाटील यांना कवठेमहांकाळ तालुक्यात संधी असतानाही चुकीच्या निर्णयांमुळे पराभव पत्करावा लागला. मतांची गोळाबेरीज चांगली जमवली, परंतु सत्तेपर्यंत पोहोचण्यात ते कमी पडले. एकूणच यापुढील काळात तालुक्यात संजयकाका, घोरपडे गटाचे संघर्ष टोकाला जाणार, हे स्पष्ट आहे.