देववाडीत आढळली ‘जायंट आफ्रिकन’ गोगलगाय, पाठीवर पाव किलो वजनाचा शंख; पिकांसाठी ठरते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:31 PM2022-01-03T14:31:27+5:302022-01-03T14:35:49+5:30
या गोगलगायीचे मूळ ठिकाण पूर्व आफ्रिका असून, सध्या ती जगातील अनेक देशांमध्ये सापडते. तिचा इतर देशामध्ये प्रसार कसा झाला, याबद्दल ठोस माहिती नाही.
विकास शहा
शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील जोतिबा मंदिरात पाठीवर पाव किलो वजनाचा शंख असलेली जायंट आफ्रिकन गोगलगाय आढळली आहे. देववाडीतील जोतिबा मंदिरात असणाऱ्या या गोगलगायीच्या पाठीवर तिच्या वजनापेक्षा मोठ्या आकाराचा शंख तयार झाला आहे. यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नाही.
गावाच्या दक्षिणेला जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असणाऱ्या जोतिबाच्या छोट्या मंदिरात या गोगलगायीचा वावर आहे. पंधरा दिवसांपूर्वी ज्ञानदेव खोत यांना गोगलगाय दिसली. सुरुवातीला आकाराने लहान असणारा शंख हळूहळू मोठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून शंखाचा आकार खूपच मोठा झाल्यामुळे आता या गोगलगायीला गतीने चालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत वारणा महाविद्यालयचे प्रा. डॉ. ए. आर. भुसनार म्हणाले, या गोगलगायीला जायंट आफ्रिकन गोगलगाय या नावाने ओळखले जाते. गोगलगायीचे मूळ ठिकाण पूर्व आफ्रिका असून, सध्या ती जगातील अनेक देशांमध्ये सापडते. तिचा इतर देशामध्ये प्रसार कसा झाला, याबद्दल ठोस माहिती नाही.
या गाेगलगायीची वाढ वेगाने होते. थंड व आर्द्रतायुक्त वातावरण या गोगलगायीसाठी पोषक असते. ही जागतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली शेतीपिकावरील कीड आहे. ही मोठ्या संख्येने आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. तसेच पिकावर वेगवेगळ्या रोगाचा प्रसार करते. असे तज्ज्ञांनी सांगितले.
शेतीपिकांसाठी घातक
शेतीपिकावरील ही घातक कीड आहे. ही गोगलगाय अख्याटीनिडी या कुळात येते. तिचे शास्त्रीय नाव लिस्साचाटीना फुलिका असे आहे. ती भारतीय नाही. १९३१ मध्ये चीनमध्ये तिचे वास्तव्य आढळले. गहू, भात व लहान उसासाठी ती घातक आहे. ज्वारीच्या आकाराची ती अंडी घालते. नर-मादीचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पत्ती कमी आहे. पिकांपासून रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात ती करते.
आफ्रिकेत पिकावरील मोठी कीड म्हणून तिची ओळख आहे. भारतात सामान्यत: आढळणाऱ्या गोगलगायी पावसाळ्यातच बाहेर पडतात. त्यांचे शरीर नाजूक असते. या गोगलगायी पिकांचे कमी नुकसान करतात.
थंड वातावरण पोषक
थंड व आर्द्रतायुक्त वातावरण या गोगलगायीसाठी पोषक असते. ही जागतिकदृष्ट्या महत्वाची असलेली शेतपिकावरील कीड आहे. ही मोठ्या संख्येने आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. तसेच पिकावर वेगवेगळ्या रोगाचा प्रसार करते. असे तज्ञांनी सांगितले.