सांगलीत सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 03:24 PM2020-07-16T15:24:02+5:302020-07-16T15:27:15+5:30
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध्दी सचिन घाटगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सांगली : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध्दी सचिन घाटगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सांगलीतील ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून सलग १८ वर्षे शाळेचा शंभर टक्के निकाल लागत आहे. यंदा प्रीती लोखंडे हिने ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. नंदिनी मोरे (९५.६०), प्रगती नायक (९५.२०) आणि सौमित्र उत्तूरकर (९५.२०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांना संस्थापक सुरेश पाटील, जयश्री पाटील, प्रिया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून सलग चौदा वर्षांपासून या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे. यात विराज रवींद्र मोहिते याने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर तनिष्का महेश माने (९६.८०), अनुराधा अरुण कुंभार व अर्णव आशिष तगारे (९६.४०) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांना बबनराव बिरनाळे, समीर बिरनाळे, सागर बिरनाळे, प्राचार्य आसिसी फुर्टाडो, शारदा खोत यांचे मार्गदर्शन मिळाले. तक्षिला स्कूलचाही शंभर टक्के निकाल लागला आहे. यात आराधना यादव हिने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर अथर्व मगदूम (९६) व सिध्दी शहा (९४) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूलची सिध्दी सचिन घाटगे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर आशुतोष बर्वे आणि आदित्य तिलक (९६.४०), ऋचा चौगुले आणि मोहित शहा (९६.२०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी गणितात, तर एका विद्यार्थ्याने संस्कृत आणि सामाजिक शास्त्र विषयात शंभर टक्के गुण मिळविले आहेत.